रत्नागिरी: कोकणचा सर्वात मोठा सण म्हणजे शिमगोत्सव! रत्नागिरी शहरातील झाडगाव येथील श्रीदेव भैरी मंदिराचा शिमगोत्सव यंदा २ मार्च ते ८ मार्च २०२६ या कालावधीत साजरा होणार आहे. श्रीदेव भैरी देवस्थान ट्रस्टने या उत्सवाचे सविस्तर नियोजन केले असून, सात दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात पालखी ग्रामप्रदक्षिणा, होळी उत्सव आणि रंगपंचमीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.
उत्सवाचा शुभारंभ: सोमवार, २ मार्च (फाल्गुन पौर्णिमा)
उत्सवाची सुरुवात २ मार्च रोजी रात्री १० वाजता होईल. झाडगाव सहाणेवरून मानकरी, ट्रस्टी आणि ग्रामस्थ पारंपरिक पद्धतीने श्रीदेव भैरीला उत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी मंदिरात जातील. मध्यरात्री १२ वाजता श्रीदेव भैरीची पालखी ग्रामप्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल.
होळीचा शेंडा आणि मांडणी: मंगळवार, ३ मार्च
मंगळवारी पहाटे ३ वाजता पालखी श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून बाहेर पडून झाडगाव नाका, टिळक आळी, मांडवी, समुद्रमार्गे खडपेवठार असा प्रवास करेल. सकाळी ११:३० वाजता राम मंदिर आणि दुपारी ३ वाजेपर्यंत झाडगाव सहाणेवर होळी उभी केली जाईल.
धुळवडीचा उत्साह: ३ आणि ४ मार्च
- ३ मार्च (रात्री): रात्री ९ वाजता धुळवड साजरी करण्यासाठी ‘निशाण’ सहाणेवरून निघेल. यामध्ये मुख्य मानकरी सांवत खोत यांच्या घरी पूजा होईल. राजिवडा येथील श्रीदेव विश्वेश्वर मंदिरात गार्हाणे घालून, मुस्लिम मानकरी श्री काद्री यांची गळाभेट घेऊन सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले जाईल.
- ४ मार्च (सकाळी): सकाळी ८ वाजता मांडवी येथून धुळवडीला सुरुवात होऊन दुपारी १२ वाजता सावंत खोतांच्या मूळ चौकीवर याची सांगता होईल.
पालखी दर्शन आणि वाडीवार नाचविणे: ४ ते ७ मार्च
४ मार्च ते ७ मार्च या कालावधीत दररोज दुपारी १२ वाजेपर्यंत श्रींची पालखी झाडगाव सहाणेवर दर्शनासाठी उपलब्ध असेल. रात्री १० ते १२ या वेळेत प्रत्येक वाडीतर्फे पारंपरिक पद्धतीने पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होईल. ७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता पालखी पुन्हा ग्रामप्रदक्षिणेसाठी मुरुगवाडा परिसरात जाईल.
रंगपंचमी आणि सांगता: रविवार, ८ मार्च (फाल्गुन पंचमी)
शिमगोत्सवाचा मुख्य आकर्षण असलेला रंगपंचमीचा सोहळा ८ मार्च रोजी पार पडेल.
- दुपारी १ वाजता: पालखी सहाणेवरून रंग खेळण्यासाठी निघेल. यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांतर्फे शस्त्र सलामी दिली जाईल.
- सायंकाळी: पालखी धनजी नाका, राधाकृष्ण नाका, राम मंदिर आणि मारुती आळी मार्गे मार्गस्थ होईल.
- रात्री ११:३०: श्रीदेव भैरीचे मंदिरात आगमन होईल आणि मध्यरात्री १२ वाजता धुपारती व गावाचे गार्हाणे घालून उत्सवाची सांगता होईल.
भाविकांना आवाहन
झाडगावचे श्रीदेव भैरी देवस्थानचे अध्यक्ष आणि ट्रस्टींनी सर्व ग्रामस्थ, मानकरी आणि भाविकांना या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. रत्नागिरीच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणाऱ्या या उत्सवासाठी प्रशासनाकडूनही जय्यत तयारी करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 23-02-2026














