रत्नागिरी/देवरूख: संगमेश्वर तालुक्यातील उजगाव तेलीवाडी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. “तुझ्यामुळे माझी मुलगी शेफारते” असे म्हणत वडील आणि चुलत्याने एका २६ वर्षीय तरुणीला लाकडी काठी आणि केरसुणीने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत तरुणीच्या तोंडाला आणि दाताला गंभीर दुखापत झाली असून, देवरूख पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
ही घटना २२ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८:०० वाजता उजगाव येथील पवार यांच्या राहत्या घरात घडली. फिर्यादी कु. तृप्ती निवृत्ती पवार (वय २६) या घराच्या अंगणात त्यांच्या चुलतीशी गप्पा मारत होत्या. यावेळी वडील निवृत्ती लक्ष्मण पवार यांनी तिथे येऊन वादावादी सुरू केली. वादाचे रूपांतर नंतर हिंसक मारहाणीत झाले.
काठी आणि केरसुणीने अमानुष मारहाण
फिर्यादीनुसार, आरोपी वडिलांनी हातातील लाकडी चिव्याची काठी घेऊन तृप्ती यांच्या संपूर्ण शरीरावर मारहाण केली. याच वेळी चुलते शंकर लक्ष्मण पवार यांनीही घरातील केरसुणी घेऊन तिला मारण्यास सुरुवात केली. या मारहाणीमुळे तृप्ती यांच्या तोंडाला, ओठावर गंभीर जखमा झाल्या असून त्यांच्या समोरील दातालाही जबर मार लागला आहे. मारहाणीनंतर भीतीपोटी तरुणीने रात्र आपल्या चुलतीकडे काढली आणि दुसऱ्या दिवशी उपचारासाठी रुग्णालय गाठले.
पोलिसांत गुन्हा दाखल
२३ फेब्रुवारी २०२६ रोजी जखमी तृप्ती पवार या ग्रामीण रुग्णालय देवरूख येथे उपचारासाठी दाखल झाल्या. रुग्णालयाकडून ‘एम.एल.सी.’ (MLC) पत्र प्राप्त झाल्यानंतर देवरूख पोलिसांनी तरुणीचा जबाब नोंदवला. या जबाबावरून पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:
- आरोपी १: निवृत्ती लक्ष्मण पवार (वय ५९ – वडील)
- आरोपी २: शंकर लक्ष्मण पवार (वय ५५ – चुलते)
पोलीसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ११५(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा (गु.र.नं. २६/२०२६) दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.














