मुंबई : टी 20 वर्ल्ड कपमधील सुपर 8 चे सामने सध्या सुरु आहेत. ग्रुप 1 मध्ये आज वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे यांच्यात लढत होती. झिम्बाब्वेनं प्रथम टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तो त्यांना महागात पडला.
वेस्ट इंडिजनं प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 6 बाद 254 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ 147 धावा करु शकला. वेस्ट इंडिजनं सुपर 8 मध्ये पहिला विजय मिळवला आहे.
वेस्ट इंडिजचा धावांचा डोंगर
झिम्बाब्वेनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा वेस्ट इंडिजनं फायदा करुन घेतला. शिमरोन हेटमायर यानं 34 बॉलमध्ये 7 षटकार आणि 7 चौकारांच्या जोरावर 85 धावा केल्या. तर, रोवमन पॉवेल यानं 59 धावा केल्या. याशिवाय शेरफन रुदरफोर्ड यानं 31 आणि रोमॅरिओ शेफर्ड यानं 21 धावा केल्या. या जोरावर वेस्ट इंडिजनं 254 धावांचा डोंगर उभा केला.
झिम्बाब्वेचा मोठा पराभव
वेस्ट इंडिजनं समोर ठेवलेल्या 254 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली नाही. ब्रायन बेनेट 5 धावा करुन बाद झाला. कॅप्टन सिकंदर रझा 27 धावा करुन बाद झाला. ब्रॅड इवान्स यानं झिम्बाब्वेचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे झिम्बाब्वेच्या विकेट नियमित अंतरानं पडत गेल्या. यामुळं झिम्बाब्वेला पराभवाचा सामना करावा लागला.झिम्बाब्वेचा संघ 147 धावांवर बाद झाला. ब्रॅड इवान्स 43 धावा करुन नाबाद राहिला. वेस्ट इंडिजच्या गडाकेश मोती यानं 4 विकेट घेतल्या, तर अकेल होसेन यानं
भारतासमोरील अडचणी वाढल्या
वेस्ट इंडिजनं झिम्बाब्वेवर मोठा विजय मिळवल्यानं ग्रुप 1 च्या गुणतालिकेत मोठे बदल झाले आहेत. वेस्ट इंडिजनं 107 धावांनी विजय मिळवत ग्रुप 1 मध्ये 2 गुणांसह आणि नेट रनरेट 5.35 सह पहिलं स्थान पटकावलं आहे. तर, दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिका असून त्यांच्याकडे 2 गुण आहेत. भारत तिसऱ्या स्थानावर असून झिम्बाब्बे चौथ्या स्थानावर आहे.
भारताला दोन्ही सामने जिंकावे लागणार
भारताचे सुपर 8 च्या ग्रुप 1 मध्ये आता वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे विरुद्ध सामने होणार आहेत. भारताला हे सामने मोठ्या फरकानं जिंकावे लागतील. तर, सुपर 8 मध्ये नेट रनरेटचा मुद्दा लागू होऊ शकतो. त्यासाठी वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका या संघांचा देखील एका सामन्यात पराभव व्हावा लागेल. आता सुपर 8 मधून उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास भारतीय संघ कसा करतो याकडे सगळ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. भारताचा पुढील सामना 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वे विरुद्ध होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:33 24-02-2026














