मुंबई: Ladki Bahin Yojana: राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. महिला व बाल विकास विभागाने सोमवार, २३ फेब्रुवारीपासून जानेवारी महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. सोमवार रात्रीपासूनच अनेक महिलांना त्यांच्या मोबाईलवर हप्ता जमा झाल्याचे संदेश (SMS) प्राप्त होत आहेत.
९८ कोटींचा निधी वितरित
या योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने १८ फेब्रुवारी रोजी महिला व बाल विकास विभागाला ९८ कोटी रुपयांचा निधी वर्ग केला होता. हा निधी प्राप्त होताच प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्ष रक्कम वाटपाची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
ई-केवायसीमुळे लाभार्थी संख्येत घट?
योजनेच्या सुरुवातीला म्हणजे जुलै २०२४ मध्ये लाभार्थी महिलांची संख्या सुमारे २ कोटी ४६ लाख इतकी होती. मात्र, राज्य सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक केले होते.
- १ कोटी ९० लाख महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण केली.
- तांत्रिकदृष्ट्या योग्य केवायसी असणाऱ्या १ कोटी ६० लाख महिलांच्या खात्यात डिसेंबर २०२५ चा हप्ता १४ जानेवारी रोजी जमा झाला होता.
- ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाभार्थ्यांच्या एकूण संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत
ज्या महिला लाभार्थ्यांकडून ई-केवायसी करताना काही चुका झाल्या आहेत किंवा ज्यांनी चुकीचे पर्याय निवडले आहेत, त्यांच्यासाठी सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे. अशा महिलांना ३१ मार्च २०२६ पर्यंत आपली ई-केवायसी दुरुस्त करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे.
आतापर्यंत १९ हप्ते पूर्ण
जुलै २०२४ पासून सुरू झालेल्या या योजनेने आता जानेवारी २०२६ पर्यंतचा टप्पा गाठला असून, पात्र महिलांना आतापर्यंत एकूण १९ हप्त्यांचा लाभ मिळाला आहे. दरम्यान, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचा लाभ घेणाऱ्या महिला शेतकऱ्यांना दरमहा ५०० रुपये या योजनेअंतर्गत दिले जात आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:24 24-02-2026














