छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी ३०० कोटींच्या निधीची मागणी

चिपळूण: संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य दिव्य राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी ३०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करावी, अशी आग्रही मागणी आमदार शेखर निकम यांनी केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे हा प्रस्ताव मांडला.

स्मारकाचे महत्त्व आणि ऐतिहासिक वारसा

आमदार निकम यांनी निवेदनात नमूद केले की, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास केवळ संगमेश्वरचा नसून तो संपूर्ण महाराष्ट्राचा आणि हिंदवी स्वराज्याचा अमूल्य वारसा आहे. महाराजांचे कार्य, लढा आणि त्याग पुढील पिढ्यांना प्रेरणा देणारा असून, या स्थळाची ऐतिहासिक ओळख जतन करणे अत्यंत गरजेचे आहे.

स्मारकाचा नियोजित आराखडा आणि प्रगती

  • निधी आणि आराखडा: रत्नागिरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या स्मारकासाठी ३१३ कोटी रुपयांचा भव्य आराखडा तयार करून शासनास सादर केला आहे.
  • जागा: या प्रकल्पासाठी सुमारे ५ एकर मुख्य जागा आणि नियोजित १०० एकर परिसर संपादित करून राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची जनतेची मागणी आहे.
  • आंतरराष्ट्रीय दर्जा: या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, अशी इच्छा दिवंगत नेते अजितदादा पवार यांनीही व्यक्त केली होती.

पर्यटनाला मिळणार मोठी चालना

स्मारकासोबतच शास्त्रीपूल ते शृंगारपूर या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मार्गाचा सर्वांगीण विकास करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • शृंगारपूर विकास: शृंगारपूर हे छत्रपती संभाजी महाराजांचे सासरवाडी असून या मार्गावर मालोजीराजे घोरपडे कारभाटले यांची समाधी देखील आहे.
  • धार्मिक पर्यटन: कसबा परिसरात सुमारे ३०० पुरातन मंदिरे असून, त्यांचा एकात्मिक विकास केल्यास हे परिसर सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटनाचे मोठे केंद्र ठरू शकते.

नदीवरील बंधारा आणि सिंचन

या प्रकल्पाचाच एक भाग म्हणून शास्त्री नदीवर कोल्हापूर टाईपचा बंधारा बांधण्यासाठी जलसंपदा विभागाने ६६ कोटी २२ लाख ७३ हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून शासनाला सादर केले आहे.

अधिवेशनाकडून अपेक्षा

२०२५-२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात या दोन्ही प्रस्तावांना मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, जेणेकरून स्मारकाच्या उभारणीस लवकरात लवकर प्रारंभ करता येईल, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:45 24-02-2026