सावर्डे (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्य वाहतुकीविरोधात पोलिसांनी कंबर कसली असून, सावर्डे पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गावर एक मोठी कारवाई केली आहे. वहाळ फाटा उड्डाणपुलावर रचलेल्या सापळ्यात ५ लाख ८६ हजार ७२० रुपयांच्या मुद्देमालासह एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे रचला सापळा
रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अवैध मद्य वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर, सावर्डे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. आबासाहेब पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, मुंबई-गोवा महामार्गावरून एका वाहनातून गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी केली जात आहे.
या माहितीची खातरजमा करून सावर्डे पोलिसांनी दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास वहाळ फाटा उड्डाणपुलावर सापळा रचला. यावेळी संशयित क्रेटा गाडी (GA-08-AN-3004) थांबवून तिची झडती घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य आढळून आले.
पाच लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी या कारवाईत खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
- गोवा बनावटीचे विदेशी मद्य: ₹ १,८६,७२०/-
- क्रेटा गाडी (GA-08-AN-3004): ₹ ४,००,०००/-
- एकूण मुद्देमाल: ₹ ५,८६,७२०/-
राजस्थानच्या चालकावर गुन्हा दाखल
या प्रकरणी वाहन चालक समुंदर सिंग श्यामसिंग राठोड (वय २४, राहणार: पेडणे, गोवा; मूळ गाव: जि. पाली, राजस्थान) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरुद्ध सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १६/२०२६ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील, पोलीस हवाल्दार पटेकर, कांबळे, पालकर आणि पोलीस शिपाई चोचे यांच्या पथकाने केली आहे.














