संगमेश्वर (प्रतिनिधी): रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील पांचांबे नेरदवाडी येथे १० वर्षांपासून सुरू असलेल्या कौटुंबिक वादाने भीषण वळण घेतले आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादात दोन जणांनी मिळून एकाच कुटुंबातील सदस्यांना लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात फिर्यादीसह त्यांची वृद्ध आई आणि एक १५ वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी संतोष महादेव सावंत (वय ४८ वर्षे) हे २३ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास त्यांचे शेजारी सुनील जाधव यांच्या घरी गप्पा मारत बसले होते. यावेळी आरोपी क्रमांक १ शाम शंकर घाडगे हा मद्यधुंद अवस्थेत तेथे आला आणि फिर्यादींना विनाकारण शिवीगाळ करू लागला. संतोष सावंत यांनी ‘शिवीगाळ का करतोस?’ असे विचारले असता, वाद अधिकच विकोपाला गेला.
काठीने बेदम मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी
त्याच वेळी आरोपी क्रमांक २ रत्नकांत बबन घाडगे हा देखील दारूच्या नशेत हातात लाकडी काठी घेऊन तेथे आला. त्याने संतोष सावंत यांच्या छातीवर, पाठीवर आणि दोन्ही हातांवर काठीने सपासप वार केले. इतकेच नव्हे तर ‘तुला संपवून टाकीन आणि रात्रभर जागवत ठेवीन’ अशी जीवे मारण्याची धमकीही दिली.
हा वाद सोडवण्यासाठी संतोष सावंत यांची वृद्ध आई नलिनी सावंत आणि शेजारी राहणारा ओम प्रदीप पवार (वय १५ वर्षे) हे पुढे आले असता, आरोपींनी त्यांनाही धक्काबुक्की करत हाताने व काठीने मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुनील जाधव, जयवंत घाडगे आणि रमेश घाडगे या प्रत्यक्षदर्शींनी हा प्रकार पाहिला.
तीन जण जखमी, संगमेश्वर पोलिसांत गुन्हा दाखल
या हाणामारीत संतोष सावंत, नलिनी सावंत आणि ओम पवार हे तिघेही जखमी झाले आहेत. याप्रकरणी फिर्यादीने २४ फेब्रुवारी रोजी पहाटे ३:२६ वाजता संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
पोलिसांनी आरोपी १) शाम शंकर घाडगे आणि २) रत्नकांत बबन घाडगे यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११८(१), ११५(२), ३५२ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर १२/२०२६ नुसार नोंद केला आहे. १० वर्षांपासून असलेल्या जुन्या घरगुती वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.














