दापोली: जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर खरेदीखताची नोंद करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना नानटे सजा येथील महिला ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) श्रद्धा बालाजी बंडे (वय ३०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली. विशेष म्हणजे ही कारवाई दापोली तहसील कार्यालयाच्या सभागृहातच बुधवारी सायंकाळी करण्यात आली, ज्यामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
तक्रारदार आणि त्यांच्या मित्रांनी मौजे तेरे वायंगणी येथे जमीन खरेदी केली होती. या खरेदीखताची सातबाऱ्यावर रीतसर नोंद करून फेरफार मंजूर करण्यासाठी तलाठी श्रद्धा बंडे यांनी तक्रारदाराकडे १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने रत्नागिरी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
तहसील कार्यालयातच पडला ‘सापळा’
तक्रार प्राप्त होताच एसीबीने प्राथमिक पडताळणी केली आणि लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार बुधवारी सायंकाळी दापोली तहसील कार्यालयातील सभागृहात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ठरलेली १० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने श्रद्धा बंडे यांना रंगेहात ताब्यात घेतले.
अवघ्या एका वर्षातच ‘एसीबी’च्या जाळ्यात
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित श्रद्धा बंडे या गेल्या वर्षीच शासकीय सेवेत रुजू झाल्या होत्या. सेवेत येऊन अवघा एक वर्ष पूर्ण होत असतानाच लाचखोरीच्या प्रकरणात अडकल्याने प्रशासकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
कारवाई करणारे पथक:
ही यशस्वी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी युनिटने खालील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली:
- शिवराज पाटील (पोलीस अधीक्षक)
- अमरसिंह जाधव (अपर पोलीस अधीक्षक)
- अविनाश पाटील (पोलीस उपअधीक्षक, एसीबी रत्नागिरी)
- मच्छिंद्र जाधव, सुहास रेंडे (पोलीस निरीक्षक) आणि कर्मचारी.
महत्त्वाची सूचना: कोणत्याही शासकीय कामासाठी कुणीही लाचेची मागणी केल्यास टोल फ्री क्रमांक १०६४ वर संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 26-02-2026














