लांजा: दरवर्षी उन्हाळ्यात जाणवणाऱ्या तीव्र पाणीटंचाईवर मात करण्यासाठी लांजा पंचायत समितीने कंबर कसली आहे. तालुक्याला टँकरमुक्त करण्याच्या उद्देशाने ४ कोटी २५ लाख ८३ हजार रुपयांचा भव्य पाणीटंचाई निवारण आराखडा तयार करण्यात आला आहे. आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, यामुळे तालुक्यातील ४२ गावे आणि ९६ वाड्यांवरील पाणीप्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
४२ गावे आणि ९६ वाड्यांचा समावेश
लांजा तालुक्यात दरवर्षी मुबलक पाऊस पडूनही मार्च ते जून या कालावधीत पाणीटंचाईची समस्या गंभीर होते. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने एकूण ९६ कामांचा समावेश असलेला हा आराखडा आखला आहे. यामध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याऐवजी नळ पाणीपुरवठा योजना, विहीर खोदणे आणि दुरुस्तीवर विशेष भर दिला जाणार आहे.
आराखड्यातील कामांचे स्वरूप आणि तरतूद
या आराखड्यांतर्गत विविध कामांसाठी निधीचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करण्यात आले आहे:
- नवीन विहीर खोदणे: ५८ लाख ८० हजार रुपयांची एकूण ४९ कामे.
- विंधन विहीर दुरुस्ती: २ लाख रुपयांची ४ कामे.
- नळपाणी दुरुस्ती व विशेष दुरुस्ती: ३ कोटी ५१ लाख ३ हजार रुपयांची ३४ कामे.
- विहीर गाळ उपसा व दुरुस्ती: ४ लाख रुपयांची ८ कामे.
- तात्पुरती पूरक नळपाणी योजना: १० लाख रुपयांची ८ कामे.
टंचाईग्रस्त वाड्यांची यादी
या आराखड्यात तालुक्यातील अनेक वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोंडगे (धनगरवाडी), कोचरी (भोजवाडी, ढोलमवाडी), देवधे (तेलीवाडी, आगवे), वाकेड, पालू (हुंबरवणेवाडी), पुनस (पूसकोंड), भांबेड (दत्तवाडी) यांसह अनेक वाड्यांचा समावेश आहे. याशिवाय शिरवली, सालपे, केळवली, हरखले आणि इसवली यांसारख्या दुर्गम भागातील वाड्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.
कायमस्वरूपी उपाययोजनेवर भर
आमदार किरण सामंत यांनी स्पष्ट केल्यानुसार, केवळ टँकरद्वारे तात्पुरती सोय न करता, गावे कायमस्वरूपी टँकरमुक्त कशी होतील याकडे अधिक लक्ष दिले जात आहे. विहिरींचे पुनरुज्जीवन आणि नळ पाणीपुरवठा योजनांच्या सक्षमीकरणामुळे ग्रामस्थांची पायपीट थांबणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:07 26-02-2026










