रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीत नियमांना बगल देऊन सुरू असलेल्या कामांचा आणखी एक खळबळजनक नमुना समोर आला आहे. नगरपालिकेच्या नवीन इमारती शेजारी उनाड कुत्र्यांसाठी उभारण्यात येणारे ५० लाख रुपयांचे निवारा व निर्बीजीकरण केंद्र उबाठा नगरसेवक केतन शेट्ये यांनी मांडलेल्या हरकतीमुळे वादात सापडले आहे. विशेष म्हणजे, कोणतीही तांत्रिक मंजुरी नसताना या कामाचे ७० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर; नगरसेवक केतन शेट्ये आक्रमक
नगरपालिकेत झालेल्या सभेमध्ये नगरसेवक केतन शेट्ये यांनी प्रशासकीय राजवटीतील या खर्चिक कामाचा पर्दाफाश केला. शिक्षण मंडळाच्या इमारतीमध्ये हे शेल्टर हाऊस उभारले जात आहे. “नगरपालिकेची नवी सुसज्ज आणि सुंदर इमारत उभी राहत असताना, त्याच आवारात आणि भर वस्तीत दुर्गंधीयुक्त शेल्टर हाऊस तयार करणे ही कल्पनाच मुळात चुकीची आहे,” असे शेट्ये यांनी सभागृहात ठणकावून सांगितले.
७०% काम पूर्ण, पण ठेकेदार कोण? अधिकाऱ्यांचे मौन
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या कामाला अद्याप अधिकृत मंजुरी मिळालेली नाही, त्याचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. केतन शेट्ये यांनी जेव्हा या कामाच्या ठेकेदाराबाबत विचारणा केली, तेव्हा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना “तो ठेकेदार कोण?” याची साधी माहितीही नसल्याचा खुलासा झाला. प्रशासनाकडून यावर “हे काम तात्पुरत्या स्वरूपाचे आहे,” अशी थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाला.
नगराध्यक्षांचे आदेश; ठेकेदाराला बसणार मोठा फटका
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी तातडीने हस्तक्षेप केला आहे. तांत्रिक मंजुरीसाठी पाठवण्यात आलेल्या या कामाला आता मंजुरी देऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. नगराध्यक्षांच्या या निर्णयामुळे, मंजुरी मिळण्यापूर्वीच घाईघाईने ७० टक्के काम उरकणाऱ्या ठेकेदाराला आता मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.









