रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि धाडसी पाऊल उचलले आहे. मागील सुमारे तीन वर्षांपासून सर्व सोयींनी सज्ज असूनही प्रशासकीय कारणास्तव बंद असलेले साळवी स्टॉप येथील ‘ट्रक टर्मिनल’ तातडीने सुरू करण्याचा आदेश नगराध्यक्षांनी आजच्या सर्वसाधारण सभेत दिला. या निर्णयामुळे साळवी स्टॉप परिसरातील नागरिकांसह ट्रक चालकांचाही मोठा प्रश्न मार्गी लागला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेले आणि अनेक वादांच्या भोवऱ्यात सापडलेले रत्नागिरी नगरपालिकेचे ‘ट्रक टर्मिनल’ अखेर सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी घेतला. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित केल्यानंतर, शहरातील वाहतूक कोंडी आणि ट्रक चालकांच्या सुरक्षेचा विचार करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आरक्षण, बिल्डर आणि ‘श्रीखंडा’ची चर्चा
या ट्रक टर्मिनलचा इतिहास अत्यंत रंजक आणि वादग्रस्त राहिला आहे. ही जागा मूळची ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित होती, मात्र नगरपालिकेने ती विहित मुदतीत खरेदी न केल्याने नियमानुसार ती जागा मूळ मालकाने एका बिल्डरला विकसित करण्यासाठी दिली होती. त्या काळात “भूखंडाचे श्रीखंड” लाटल्याच्या अनेक चर्चा शहरात रंगल्या होत्या. अखेर मुख्याधिकाऱ्यांनी संबंधित बिल्डरला हे आरक्षण विकसित करण्याची परवानगी दिली. अनेक तडजोडींनंतर हे टर्मिनल उभे राहिले, पण गेल्या तीन वर्षांपासून ते धूळ खात पडून होते.
साळवी स्टॉप परिसरातील नागरिकांना दिलासा
सध्या साळवी स्टॉप परिसरात रस्त्याच्या दुतर्फा अनेक ट्रक पार्क केले जातात. यामुळे:
स्थानिक नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.
सुरक्षित पार्किंग नसल्याने ट्रकमधील डिझेल आणि बॅटरी चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत.
शहरातील मुख्य रस्त्यांवर खासगी बस देखील उभ्या राहत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
या ट्रक टर्मिनलमुळे हे सर्व अवजड ट्रक आणि खासगी बस एका सुरक्षित ठिकाणी पार्क होतील, ज्यामुळे शहराच्या अंतर्गत वाहतुकीला शिस्त लागेल.
गाळ्यांच्या वाटपावरून पुन्हा वाद; आता होणार पुनर्लीलाव ?
प्रशासकीय राजवटीमध्ये या ट्रक टर्मिनल मधील गाळ्यांची वाटणी आपापसात झाली असल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. याबात काही तक्रारी देखील करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, कालच्या सभेत काही नगरसेवकांनी यावर आक्षेप घेतला. “हे गाळे केवळ ट्रक व्यवसायाशी संबंधित असलेल्या व्यक्तींनाच मिळावेत,” अशी मागणी लावून धरण्यात आली. यानंतर या गाळ्यांचा पुनर्लीलाव करण्याचा विचार सुरु आहे, जेणेकरून पारदर्शक पद्धतीने वाटप होईल.
खासगी बस चालकांची ‘पास’ची मागणी
शहरातील खासगी बस चालकांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. “आम्हाला गाड्या पार्क करण्यासाठी ठराविक शुल्क आकारून महिन्याचा पास (Monthly Pass) दिला, तर ते आमच्यासाठी खूप सोयीचे होईल,” अशी मागणी बस चालकांनी केली आहे. यामुळे नगरपालिकेच्या उत्पन्नातही भर पडणार आहे.
नगराध्यक्षांच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नगरसेवक सौरभ मलुष्टे आणि इतर सदस्यांनी नगराध्यक्षांचे आभार मानले. शिल्पा सुर्वे यांच्या या निर्णयामुळे साळवी स्टॉप परिसरातील रस्ते लवकरच मोकळे श्वास घेतील, अशी आशा रत्नागिरीकरांना वाटत आहे.













