रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील पऱ्याची आळी आणि गुरुकृपा मंगल कार्यालय परिसरात २०१६ साली घडलेल्या सैफुल्ला या फकिराच्या गोळीबार आणि खून प्रकरणाचा निकाल अखेर लागला आहे. रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी पुराव्याअभावी आरोपी रिजवान शेख याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीतर्फे प्रसिद्ध वकील ॲड. संकेत घाग यांनी केलेला युक्तिवाद या प्रकरणात निर्णायक ठरला.
नेमकी घटना काय होती?
सरकार पक्षाच्या दाव्यानुसार, २९ जून २०१६ रोजी सायंकाळी ७:५० वाजता ही घटना घडली होती. आरोपी रिजवान शेख आणि मयत सैफुल्ला हे दोघेही रत्नागिरीत भीक मागून फिरणारे ‘फरिस्ते’ (फकीर) होते. त्यांच्यामध्ये पैशांच्या व्यवहारावरून वाद झाला होता. याच वादातून रिजवानने कट रचून सैफुल्लाचा पाठलाग केला आणि गुरुकृपा मंगल कार्यालयासमोर त्याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. गंभीर जखमी झालेल्या सैफुल्लाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
पोलिसांचा तपास आणि ‘ओळख परेड’
पोलिसांनी या प्रकरणात असा दावा केला होता की: १. घटनेनंतर मारेकरी बंदुकीचा धाक दाखवून पळून गेला. २. आरोपीला पळताना दोन साक्षीदारांनी (दुबे आणि अकबाणी) पाहिले होते आणि त्यांनी ओळख परेडमध्ये आरोपीला ओळखले होते. ३. घटनेच्या दुसऱ्या दिवशी आरोपीला राजापूर जकात नाका येथे अटक करण्यात आली आणि त्याच्याकडे गावठी कट्टा, काळा बुरखा व गोळ्या सापडल्या. ४. बॅलेस्टिक तज्ज्ञांच्या अहवालानुसार, मयताच्या शरीरातील गोळी ही जप्त केलेल्या कट्ट्यातूनच झाडण्यात आली होती.
संरक्षण पक्षाचा ‘बनावट पुराव्या’वर प्रहार
आरोपीतर्फे ॲड. संकेत घाग यांनी सरकार पक्षाचा संपूर्ण पुरावा खोडून काढला. त्यांनी न्यायालयात खालील महत्त्वाचे मुद्दे मांडले:
- बनावट साक्षीदार: पोलिसांनी उभे केलेले साक्षीदार खोटे असून त्यांच्या जबाबात आणि कोर्टातील साक्षीत मोठी तफावत होती.
- अटक प्रसंग संशयास्पद: आरोपीला राजापूरला पकडल्याचा पोलिसांचा दावा बनावट होता. उलट तपासात असे समोर आले की, घटनेच्या रात्रीच काही फकिरांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते.
- तांत्रिक विसंगती: २०१६ मध्ये त्या भागात नगरपालिकेचे लाईट पोल होते की नाही, इथपासून सर्व बाबींना आव्हान दिले गेले. तसेच वैद्यकीय अहवाल आणि पोलिसांनी पाठवलेला मुद्देमाल यात सुसंगतता नव्हती.
- बनावट घटनाक्रम: पोलिसांनी मूळ घटना लपवून, ताब्यात घेतलेल्या फकिरांपैकी एकाला गोवण्यासाठी हा बनावट घटनाक्रम रचला, असा जळजळीत युक्तिवाद ॲड. घाग यांनी केला.
न्यायालयाचा निकाल
सरकार पक्ष प्रत्यक्ष किंवा परिस्थितीजन्य पुराव्यांच्या साखळीतील आवश्यक दुवे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे न्यायालयाने नमूद केले. पोलिसांनी सादर केलेला पुरावा विश्वासार्ह नसल्याचे स्पष्ट करत, न्यायाधीश व्ही. वाय. जाधव यांनी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आरोपी रिजवान शेखची निर्दोष मुक्तता केली.
यांनी पाहिले आरोपीचे काम
आरोपीतर्फे ॲड. संकेत घाग यांनी मुख्य वकील म्हणून काम पाहिले. त्यांना ॲड. गायत्री मांडवकर यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच या कायदेशीर लढाईत ॲड. महेश मांडवकर, ॲड. पवन तांबडे आणि ॲड. पराग सुर्वे यांनीही सहकार्य केले.














