Shimgotsav 2026: कोकणात ग्रामदैवतांच्या पालख्या निघाल्या.. पालखीच्या मुक्कामावर रंगतोय ‘नमन-खेळे’ लोककलेचा जागर!

रत्नागिरी: “पयलं नमान माजं नवखंड प्रिथ्वीला, दुसरं नमान माजं चांद वो सूर्याला…” या स्वरांनी सध्या कोकणच्या ग्रामीण भागातील रात्री दुमदुमून गेल्या आहेत. फाल्गुन महिना सुरू झाला की कोकणी माणसाला वेध लागतात ते लाडक्या शिमगोत्सवाचे. मोठ्या होमाची प्रतीक्षा असली तरी ग्रामीण भागात छोट्या होळ्या पेटल्या असून, देवाला कौल लावून पालख्यांचे आगमन गावच्या वेशीवर झाले आहे. याच पालखीच्या मुक्कामावर आता रात्रभर रंगत आहे तो पारंपरिक ‘नमन-खेळे’ हा आगळावेगळा लोककलाप्रकार.

काय आहे ‘नमन-खेळे’ लोककला?

नमन हा प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी समाजाचा वैशिष्ट्यपूर्ण लोककलाप्रकार आहे. ज्याप्रमाणे सिंधुदुर्गात ‘दशावतार’ लोकप्रिय आहे, तसे रत्नागिरीत ‘नमन-खेळे’ घराघरात पोहोचले आहे. पालखीसोबत जे लोक (खेळी) फिरतात, ते रात्रीच्या वेळी देवाला जागवण्यासाठी आणि ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी हा खेळ सादर करतात, म्हणून याला ‘नमन-खेळे’ असे नाव पडले.

कुठलेही नेपथ्य नाही, फक्त माणसांची ‘जिवंत भिंत’!

नमन या कलेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी कोणत्याही पडद्याची किंवा रंगमंचाची (Set) गरज नसते. १५-२० कलाकारांची एक आडवी फळी अंगणात उभी राहते. ही ‘माणसांची भिंत’च आधुनिक रंगभूमीवरील विंगेचे काम करते. या भिंतीच्या मागेच पात्रांची वेशभूषा चालते आणि तिथूनच पात्रे प्रवेश करतात.

विशेष टिप: प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांनी आपल्या अजरामर ‘घाशीराम कोतवाल’ नाटकातील मानवी भिंतीची प्रेरणा याच कोकणी नमन प्रकारातून घेतली होती.

गण, गवळण आणि शंकासुराची एन्ट्री!

नमनाचा श्रीगणेशा निसर्ग आणि देवदेवतांच्या वंदनाने होतो. त्यानंतर:

  • गणपती आणि नटवा: गणपतीचे आगमन होऊन तो नाचून गेल्यावर ‘नटवा’ आपल्या विनोदाने प्रेक्षकांना हसवतो.
  • कृष्ण-पेंद्या आणि गवळणी: मथुरेच्या बाजारला जाणाऱ्या गवळणी आणि त्यांची वाट अडवणारा कृष्ण-सुदामा यांचा खेळ रंगतो.
  • शंकासुराची दहशत: रात्रीच्या गडद अंधारात अचानक प्रेक्षकांच्या मागून धावत येणारा कभिन्न काळ्या वेशातील ‘शंकासुर’ अबालवृद्धांची दाणादाण उडवतो, हे नमनाचे मुख्य आकर्षण असते.
  • उत्तररंग: मध्यंतरानंतर रामायण, महाभारत किंवा पुराणातील कथांवर आधारित ‘आख्यान’ सादर केले जाते.

बदलते स्वरूप आणि परंपरा

पूर्वीच्या नमनात स्थानिक बोलीभाषेचा आणि गावाच्या वैशिष्ट्यांचा समावेश असायचा. ‘हबशी-फिरंग्यांचे’ मुखवटे नाचवले जायचे. मात्र, आजच्या काळात या कलेत काहीसा आधुनिक ‘चकचकीतपणा’ आला असला, तरी दापोली आणि राजापूरच्या ग्रामीण भागात आजही अस्सल गावरान नमन पाहायला मिळते.

शिमग्यापासून सुरू झालेले हे नमनाचे खेळ गुढीपाडव्यापर्यंत अखंड सुरू राहणार आहेत. कोकणच्या या समृद्ध लोककलेचा आनंद घेण्यासाठी सध्या चाकरमानी आणि पर्यटक गावागावांत गर्दी करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 28-02-2026