कोकणातील शाळांना पालकमंत्र्यांचे अभय! सामंत बंधूंच्या पाठपुराव्यामुळे शाळा बंद होण्याचे संकट टळले; हजारो शिक्षकांना मोठा दिलासा

रत्नागिरी: कोकणातील दुर्गम आणि डोंगराळ भागातील मराठी प्राथमिक व माध्यमिक शाळांवर घोंगावणारे बंद होण्याचे संकट अखेर टळले आहे. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि लांजा-राजापूर मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या विशेष प्रयत्नांमुळे शिक्षण विभागाने आपल्या कठोर निकषांमध्ये फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे कोकणातील शेकडो शाळा आणि हजारो शिक्षकांना जीवदान मिळाले आहे.


मुंबईत झाली महत्त्वपूर्ण बैठक

शाळांच्या पटसंख्येबाबत असलेल्या जाचक अटींबाबत मुंबईत शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली एक निर्णायक बैठक पार पडली. या बैठकीला सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार किरण सामंत, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार महेंद्र दळवी, शिक्षण सचिव रणजितसिंह देओल आणि कोकण विभागातील चारही जिल्ह्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी उपस्थित होते.


कोकणासाठी स्वतंत्र निकषांची मागणी मान्य

बैठकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी कोकणची दुर्गम भौगोलिक परिस्थिती आणि डोंगरदऱ्यात विखुरलेली वस्ती यांचा वास्तववादी आराखडा मांडला. “कोकणातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्याच्या सर्वसाधारण निकषांपेक्षा कोकणासाठी वेगळे आणि शिथिल निकष लावण्यात यावेत,” अशी आग्रही भूमिका सामंत बंधूंनी मांडली. याला शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तांत्रिक पुराव्यानिशी साथ दिली.


बैठकीतील ५ मोठे आणि दिलासादायक निर्णय:

१. कमी पटसंख्येच्या शाळांना जीवदान: इयत्ता ९ वी आणि १० वीच्या वर्गासाठी असलेली २० विद्यार्थ्यांची अट शिथिल करून ती आता केवळ १० विद्यार्थी इतकी करण्यात आली आहे. यामुळे कमी पटसंख्या असलेल्या माध्यमिक शाळा आता बंद होणार नाहीत. २. शिक्षकांचे समायोजन जिल्ह्यांतर्गतच: अतिरिक्त ठरणाऱ्या पदवीधर शिक्षकांचे समायोजन रिक्त असलेल्या मंजूर पदांवरच केले जाईल. परिणामी, एकाही शिक्षकाला जिल्ह्याबाहेर बदली होऊन जावे लागणार नाही. ३. उर्दू शाळांचे संरक्षण: उर्दू प्राथमिक शाळांमधील शिक्षकांचे समायोजन केवळ उर्दू शाळांमध्येच करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ४. संच मान्यतेतील त्रुटी दूर: १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयामुळे उद्भवलेल्या त्रुटी दूर करण्याचे आश्वासन शिक्षण विभागाने दिले आहे. ५. शैक्षणिक उभारी: दुर्गम भागातील एकही वर्ग किंवा शाळा बंद पडणार नाही, याची खात्री प्रशासनाने दिली आहे.


“दिलेला शब्द पाळला” – समन्वय समिती

“पालकमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता की, जिल्ह्यातील एकाही शाळेचा वर्ग बंद पडू देणार नाही. प्रशासकीय पातळीवर यशस्वी लढा देऊन त्यांनी आपला शब्द खरा करून दाखवला आहे,” अशा भावना रत्नागिरी जिल्हा समन्वय समितीचे पदाधिकारी दिलीप देवळेकर यांनी व्यक्त केल्या.

या बैठकीला समन्वय समितीचे सागर पाटील, आयुब मुल्ला, महेश पाटकर, दीपक शिंदे यांच्यासह कोकणातील चारही जिल्ह्यांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या निर्णयामुळे कोकणातील पालक, विद्यार्थी आणि शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण असून सामंत बंधूंचे सर्वत्र आभार मानले जात आहेत.