सामंत-शिंदे जोडी टेनिस क्रिकेटचा कायापालट करणार! महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी उदय सामंत, तर देशाची धुरा श्रीकांत शिंदेंकडे

मुंबई/रत्नागिरी: महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या टेनिस क्रिकेट या खेळाला आता अधिकृत आणि व्यावसायिक स्वरूप मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत यांची ‘टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन महाराष्ट्र’ राज्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सामंत यांनी या पदाचा अधिकृत पदभार स्वीकारला असून, टेनिस क्रिकेटचा कायापालट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.


सामान्य कुटुंबातील खेळाडूंसाठी उघडणार संधींची दारे

अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर उदय सामंत यांनी टेनिस क्रिकेट खेळाडूंच्या भविष्यासाठी काही महत्त्वाचे संकल्प जाहीर केले:

  • करिअर आणि नोकरी: टेनिस क्रिकेट खेळणारे ९०% खेळाडू हे सामान्य कुटुंबातील असतात. त्यांना या खेळात करिअर करता यावे आणि उत्कृष्ट खेळाडूंना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील.
  • केंद्र शासनाची मान्यता: टेनिस क्रिकेटला अधिकृत खेळ म्हणून केंद्र शासनाची मान्यता मिळवून देण्यासाठी युद्धपातळीवर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  • शालेय शिक्षणात समावेश: इतर खेळांप्रमाणेच शालेय अभ्यासक्रमात टेनिस क्रिकेटचा समावेश व्हावा, हा सामंत यांचा मुख्य अजेंडा आहे.

३६ जिल्ह्यांत भव्य स्पर्धांचे आयोजन

महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लवकरच राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केल्या जातील. लेदर क्रिकेटप्रमाणेच खेळाडूंकडे टेनिस क्रिकेटला करिअर म्हणून पाहण्याचे पोषक वातावरण महाराष्ट्रासह संपूर्ण देशात तयार करण्याचा मानस मंत्री महोदयांनी बोलून दाखवला.


खासदार श्रीकांत शिंदे यांचे नेतृत्व आणि आगामी ‘प्रेसिडेंट कप’

“टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन इंडिया (ITCSF) ला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या रूपाने एक तरुण आणि तडफदार राष्ट्रीय अध्यक्ष मिळाले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतात टेनिस क्रिकेटचा शिस्तप्रिय पद्धतीने प्रसार होईल,” असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

येत्या ३१ मार्च ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे ‘प्रेसिडेंट कप’ ही १६ राज्यांची मोठी स्पर्धा पार पडणार आहे. या स्पर्धेदरम्यान फेडरेशनच्या पुढील योजना आणि भविष्यातील स्पर्धांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.