खगोलप्रेमींसाठी पर्वणी! ३ मार्चला दिसणार दुर्मिळ ‘चंद्रोदय समयी चंद्रग्रहण’; जाणून घ्या तुमच्या शहरातील वेळ

ठाणे: येत्या मंगळवारी, ३ मार्च रोजी अवकाशात एक नैसर्गिक चमत्कार पाहायला मिळणार आहे. या दिवशी चंद्र हा ग्रहणातच उगवणार असून, हे विलोभनीय दृश्य साध्या डोळ्यांनी पाहता येणार असल्याची माहिती खगोल अभ्यासक आणि पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.

ग्रहण सुटण्याची वेळ एकच, दिसण्याची वेळ वेगळी

मंगळवारी सायंकाळी ६:४८ वाजता एकाच वेळी सर्वत्र चंद्रग्रहण सुटणार आहे. मात्र, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांत चंद्रोदयाची वेळ वेगवेगळी असल्याने, हे ग्रहण किती वेळ दिसेल यामध्ये तफावत असणार आहे. चंद्रोदयापासून ते सायंकाळी ६:४८ वाजेपर्यंतच हे ग्रहण पाहता येईल.

प्रमुख शहरांमधील वेळ आणि कालावधी:

  • मुंबई: चंद्रोदय सायं. ६:४५ वा. (फक्त ३ मिनिटे ग्रहण दिसणार)
  • पुणे: चंद्रोदय सायं. ६:४१ वा. (७ मिनिटे दिसणार)
  • कोल्हापूर: चंद्रोदय सायं. ६:४० वा. (८ मिनिटे दिसणार)
  • नाशिक: चंद्रोदय सायं. ६:४० वा.
  • नागपूर: चंद्रोदय सायं. ६:१८ वा.
  • सोलापूर: चंद्रोदय सायं. ६:३३ वा.
  • रत्नागिरी: चंद्रोदय सायं. ६:४४ वा.
  • छत्रपती संभाजीनगर: चंद्रोदय सायं. ६:३४ वा.

ग्रहणाचे स्वरूप आणि शास्त्र

३ मार्च रोजी दुपारी ३:२० वाजता चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. मात्र, त्या वेळी चंद्र पूर्व क्षितिजाखाली असल्याने आपल्याला तो दिसणार नाही. जेव्हा चंद्रबिंब पृथ्वीच्या दाट छायेत येते, तेव्हा ते काळसर-लालसर रंगाचे दिसते. हा एक नैसर्गिक आविष्कार असून तो सर्वांनी अनुभवला पाहिजे, असे सोमण यांनी सांगितले.

होळी आणि धूलिवंदन साजरे करता येणार

विशेष म्हणजे, यंदा ग्रहणाच्या काळातच होळीचा सण येत आहे. दा. कृ. सोमण यांच्या माहितीनुसार, ग्रहण वेधकाळात धूलिवंदन करता येते आणि होळीचा रंगांचा सण उत्साहात साजरा करता येणार आहे.

शिक्षक आणि पालकांनी मुलांना हे चंद्रग्रहण दाखवून त्यामागील खगोलशास्त्रीय माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:21 28-02-2026