श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात शनिवारी दीपोत्सव

देवगड : प्रतिवर्षीप्रमाणे दीपावली पाडवा सणाच्या निमित्ताने शनिवारी (ता. २) सायंकाळी श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर दीपोत्सवाने उजळणार आहे. यानिमित्त मंदिर व परिसरामध्ये हजारो दिव्यांची आरास केली जाणार आहे. सायंकाळी ६ ते ८.३० यावेळेत ‘स्वरसंध्या’ हा सांजसंगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे, याबाबत देवस्थान ट्रस्टने माहिती दिली.

यावेळी एकनाथ तेली, हेमंत वातकर, रामदास तेजम, महेश ताम्हणकर, प्रशांत शिंदे, चंद्रकांत घाडी, दीपिका मुणगेकर, अजय नाणेरकर, संजय आचरेकर, अनंत वाळके, आदी उपस्थित होते. श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थांतर्फे प्रतिवर्षी दीपावली पाडव्यादिवशी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमादरम्यान असंख्य भाविक सहभागी होत असतात. यंदाचा दीपोत्सव शनिवारी साजरा होणार आहे. त्यानिमित्त मंदिर व परिसरामध्ये हजारो दिव्यांची आरास होणार आहे. विविध प्रकारच्या रांगोळ्या साकारल्या जाणार आहेत, यासाठी सर्व रांगोळी कलाकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. यादिवशी सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेमध्ये ‘स्वरसंध्या’ हा सांजसंगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. सायंकाळी ६.३० वाजता मंदिरामध्ये मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर मंदिर व परिसरातील दीप उजळले जाणार आहेत. त्यामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे भक्तांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:18 PM 30/Oct/2024