रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील पालीचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थान पाली पाथरटचा वार्षिक शिमगोत्सव मोठ्या उत्साहात सुरू होत आहे. या उत्सवामध्ये पालखी सजविणे, देवाला रूपे लावणे, होळी आणणे, पौर्णिमेचा होम आणि नवस बोलणे-फेडणे यांसारखे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
नियोजनासाठी पार पडली महत्त्वाची सभा
या उत्सवाच्या नियोजनासाठी नुकतीच फाक पंचमीला मंदिरामध्ये एक सभा पार पडली. देवस्थानचे अध्यक्ष व मुख्य मानकरी संतोष सावंतदेसाई (खोत) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला गुरुराज सावंत, अनंत पालकर, प्रदीप घडशी आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
असे असेल शिमगोत्सवाचे वेळापत्रक:
- २८ फेब्रुवारी (शनिवार): दुपारी २ वाजता सवाणेवरून श्री देव व गावकरी होळी आणण्यासाठी जातील. रात्री ९:३० वाजता होळीजवळ नवस बोलणे व फेडणे होईल, तर रात्री १०:३० वाजता पाली गावच्या सुप्रसिद्ध नमानाचा कार्यक्रम रंगणार आहे.
- २ मार्च (सोमवार): दुपारी २ वाजता सवाणेवरून श्रीदेव व गावकरी नेमलेल्या ठिकाणाहून श्रींची कोकड होळी आणण्यासाठी जातील. रात्री १० वाजता पौर्णिमेचा होम आणि नवस बोलणे-फेडणे कार्यक्रम होईल.
- ३ मार्च: धुळवडीसाठी ढोल व निशाण जाईल.
- ८ मार्च (रंगपंचमी): सवाणेवर बैठकीत शिंपण्याचे कार्यक्रम होतील व देवाच्या ग्रामफेरीचे आयोजन केले जाईल. पालखी प्रथम आगमनाच्या ठिकाणी म्हणजे देवाचा आंबा (देवतळे) येथे जाऊन पूजा स्वीकारेल.
- १९ मार्च (गुढीपाडवा): सायंकाळी पालखीची ग्रामफेरी पूर्ण होऊन मुख्य मानकरी संतोष सावंतदेसाई यांच्या घरी पालखी वस्तीला राहील. येथे रात्री गादीवरची पूजा आणि महानैवेद्य होईल.
- २० मार्च: गादीवरची गावाची बैठक होऊन ढोलताशांच्या गजरात पालखी मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करेल. त्यानंतर गावाचे गाऱ्हाणे होऊन मंदिरात देवांची प्राणप्रतिष्ठा होईल.
भाविकांना दर्शनाचे आवाहन
या मंगलमयी सोहळ्याचा आणि श्री लक्ष्मीपल्लीनाथांच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष संतोष सावंत-देसाई (खोत) यांनी सर्व भाविकांना केले आहे. कोकणी संस्कृतीचा वारसा जपणारा हा शिमगोत्सव पाली परिसरात मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:32 28-02-2026














