Sunetra Pawar on Ajit Pawar Death: अजितदादांच्या अपघाताला 1 महिना पूर्ण, सुनेत्रा पवारांची काळजाला भिडणारी पोस्ट..

पुणे/बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातील एक झंझावाती नेतृत्व, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी एक महिना पूर्ण झाला आहे. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात दादांचे निधन झाले होते. या दुःखद घटनेने संपूर्ण महाराष्ट्र आजही सुन्न आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी आणि राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.

‘जिवाभावाचा माणूस हरपला’; सुनेत्रा पवारांची भावूक पोस्ट

अजित पवार यांच्या निधनाला महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सुनेत्रा पवार यांनी ‘X’ (ट्विटर) वर आपल्या पतीच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,

“जिवाभावाचा माणूस… माणुसकीची खोल जाण, काम करण्याची अखंड प्रामाणिक तळमळ आणि समाजासाठी झटण्याची अविरत वृत्ती, हेच अजितदादांचे खरे व्यक्तिमत्त्व होते. जनहितासाठी सत्ता वापरण्याची त्यांची ठाम भूमिका, दूरदृष्टीतून उभा केलेला विकासाचा मार्ग आणि कामातून कमावलेला जनतेचा अपार विश्वास, हेच त्यांच्या जीवनकार्याचे खरे विश्व होते.”

सुनेत्रा पवार पुढे लिहितात, “स्वभावाने दिलदार आणि आपुलकीने माणसं जोडणारे, तर निर्णयाच्या वेळी तितकेच रोखठोक आणि विकासाभिमुख नेतृत्व, अशी त्यांची वेगळी ओळख होती. आज त्यांच्या उणीवेची वेदना मनाला सतत जाणवते; पण त्यांचे विचार, त्यांची कार्यतत्परता आणि राष्ट्रवादी परिवाराला त्यांनी दिलेले बळ मला आणि आपणा सर्वांना पुढे जाण्याची नवी प्रेरणा देत राहील.”


२८ जानेवारी २०२६: महाराष्ट्रासाठी ‘काळा दिवस’

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नियोजित असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळावर लँडिंगच्या तयारीत असताना तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळले. हा अपघात इतका भीषण होता की, यात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती.

‘विकासाचे राजकारण’ हीच त्यांची ओळख

अजित पवार हे त्यांच्या प्रशासकीय पकडीसाठी आणि वेगाने काम करण्याच्या पद्धतीसाठी ओळखले जात. सुनेत्रा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये त्यांच्या याच पैलूवर प्रकाश टाकला आहे. “प्रत्येक समाजघटकाला आधार देत त्यांनी सातत्याने ‘विकासाचे राजकारण’ जपले. दादा सदैव आपल्या स्मरणात, विचारांत आणि कृतीत राहतील,” असेही त्यांनी नमूद केले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी

अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज महिना पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बारामतीसह संपूर्ण राज्यातून समर्थकांनी दादांना सोशल मीडियाच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलेल्या भावनांमुळे कार्यकर्त्यांचे डोळे पुन्हा एकदा पाणावले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:22 28-02-2026