‘ना. उदय सामंत यांच्यामुळेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा’; सुहास विध्वंस यांचे प्रतिपादन

रत्नागिरी: मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यात राज्याचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी केलेले कार्य मोलाचे आहे, असे प्रतिपादन आकाशवाणी केंद्राचे निवृत्त कार्यक्रमाधिकारी सुहास विध्वंस यांनी केले. पाली येथील डी. जे. सामंत महाविद्यालयात आयोजित ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

उदय सामंत यांच्या प्रयत्नांची दखल

सुहास विध्वंस यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, मराठी भाषेला अनेक वर्षे अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. हा संघर्ष खऱ्या अर्थाने डॉ. उदय सामंत यांनी मराठी भाषा मंत्रिपद मिळाल्यानंतर प्रभावीपणे पुढे नेला. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच मराठीला हा बहुमान मिळाला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

ग्रंथदिंडी आणि सांस्कृतिक दर्शन

मराठी राजभाषा दिनानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने भव्य ‘ग्रंथदिंडी’ काढण्यात आली. या ग्रंथदिंडीत विद्यार्थ्यांनी लेझीम, पोवाडा, वासुदेव, कोळी नृत्य, वारकरी दिंडी आणि भारुड अशा विविध लोककला सादर करून महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडवले. ग्रंथदिंडीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब सामंत, उपाध्यक्ष महेश सामंत आणि प्रमुख पाहुणे सुहास विध्वंस यांच्या हस्ते करण्यात आले.

मराठी टिकवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अण्णासाहेब सामंत यांनी मराठी भाषा टिकवण्यासाठी सर्व मराठी माणसांनी मनापासून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. पालीसारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाच्या उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


विविध स्पर्धांचा निकाल

या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विजेते खालीलप्रमाणे आहेत:

  • रांगोळी स्पर्धा: प्रथम – अदिती दाणे व समीक्षा कांबळे, द्वितीय – सुहानी माईन व बिंदिया पेजे.
  • पोस्टर स्पर्धा: प्रथम – ऋतिका मांडवकर, द्वितीय – अनुष्का पर्वते, तृतीय – शेजल गोताड.
  • मराठी घोषवाक्य स्पर्धा: प्रथम – सिद्धी ठीक, द्वितीय – अनुष्का पर्वते, तृतीय – ऋतिका दिवाळे.

उपस्थित मान्यवर

या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष महेश सामंत, प्राचार्य कुशबा करे, डॉ. कांता कांबळे, नूतन कांबळे, सुहास मावळणकर आणि प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रज्ञा तांबे यांनी केले. आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ. कांता कांबळे यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:52 28-02-2026