रत्नागिरी: स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी आणि “महिला काहीही करू शकतात” हा संदेश देण्यासाठी जर्मनीची प्रसिद्ध अल्ट्रा रनर अलिशिया सध्या मुंबई ते गोवा असा ५०० किलोमीटरहून अधिकचा प्रवास पायी धावत पूर्ण करत आहे. कोकणच्या निसर्गरम्य किनारपट्टीवरून धावताना रत्नागिरीत तिला आलेल्या एका अनुभवाने ती भारावून गेली असून, तिची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई ते गोवा: सक्षमीकरणासाठी ‘अल्ट्रा रन’
अलिशिया ही जर्मनीतील एक धावपटू आहे. मुंबईपासून सुरू झालेला तिचा हा प्रवास गोव्यापर्यंत चालणार आहे. या मोहिमेमागील तिचा उद्देश केवळ शारीरिक क्षमता सिद्ध करणे हा नसून, जगभरातील महिलांना प्रेरित करणे हा आहे.
“मला प्रत्येक महिलेला हे दाखवून द्यायचे आहे की आपण शक्तिशाली आहोत. आपण केवळ धावू शकत नाही, तर कोणताही खेळ खेळू शकतो आणि हवं ते साध्य करू शकतो. ही ताकद गावोगावी पोहोचली पाहिजे,” असे अलिशियाने आपल्या संदेशात म्हटले आहे.
रत्नागिरीत माणुसकीचे दर्शन: एका गरिबाने जिंकले मन
रत्नागिरीच्या परिसरातून धावत असताना अलिशियाला भारतीय संस्कृतीतील ‘अतिथी देवो भव’ या मूल्याचा अनोखा अनुभव आला. तिने आपल्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये एक हृदयस्पर्शी किस्सा शेअर केला आहे.
ती म्हणते, “इथे प्रत्येकजण मला मदत करत आहे. आत्ताच एक माणूस मला भेटला, जो दिसायला अत्यंत गरीब होता. पण त्याने स्वतः दुकानात जाऊन माझ्यासाठी पाण्याची बाटली विकत आणली आणि मला दिली. मी त्याला नको म्हटले, पण त्याची ती बाटली मी स्वीकारावी अशी मनापासून इच्छा होती. तो ‘मुंबई-मुंबई’ असं काहीतरी म्हणत होता, मला त्याचं बोलणं समजलं नाही, पण त्याच्या डोळ्यातील आपुलकी खूप काही सांगून गेली.”
“जगाचं सौंदर्य पाहायचं असेल तर प्रवासाला बाहेर पडा”
बातम्यांमधून दिसणारे जग आणि प्रत्यक्षात अनुभवलेले जग यात किती तफावत असते, हे अलिशियाने अत्यंत मार्मिकपणे मांडले आहे. ती सांगते:
“जर तुम्हाला हे जग किती भयानक आहे हे पाहायचं असेल, तर बातम्या बघा. पण जर तुम्हाला हे जग खरोखर किती सुंदर आहे हे अनुभवायचं असेल, तर घराबाहेर पडा आणि प्रवासाला लागा. इकडची लोकं खरंच अद्भूत आहेत.”
सावध राहा… पण कशापासून?
भारतात प्रवास करताना परदेशी पर्यटकांना अनेकदा ‘सावध राहा’ (Be Careful) असा सल्ला दिला जातो. यावर अलिशियाने दिलेले उत्तर प्रत्येकाचे डोळे ओलावणारे आहे. ती म्हणते, “लोक म्हणतात सावध राहा… पण कशापासून? तर या लोकांच्या पुन्हा एकदा प्रेमात पडण्यापासून! इथल्या लोकांच्या माणुसकीने तुमचं मन अधिक हेलावून जाऊ नये, यासाठी स्वतःला सावरून धरा. भारतात प्रवासादरम्यान हीच काळजी घ्या!”
कोकण किनारपट्टीवर अलिशियाचे स्वागत
अलिशिया सध्या रत्नागिरीतून दक्षिण कोकणाकडे मार्गस्थ होत आहे. वाटेत तिला भेटणारे ग्रामस्थ, तरुण आणि महिला तिचे मोठ्या उत्साहात स्वागत करत आहेत. तिची ही जिद्द आणि भारतीय माणुसकीबद्दलची तिची ओढ पाहून रत्नागिरीकरही तिचे कौतुक करत आहेत.













