खेड : खेड शहरातील कन्याशाळेच्या वर्गखोल्या कोसळण्याच्या परिस्थितीत होत्या. या खोल्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने कानाडोळा केला. निधी मिळत नसल्याचे कारण प्रशासनाने पुढे केले होते. सुरक्षिततेसाठी येथील विद्यार्थ्यांचे वर्ग अन्यत्र भरवण्यास सुरवात झाली होती; परंतु विधानसभा निवडणुकीसाठी या परिसरात ३ मतदान केंद्रे निश्चित झाली. त्यासाठी कन्याशाळेचे नाव निश्चित करण्यात आल्यामुळे तिन्ही वर्गखोल्यांच्या दुरुस्तीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.
कन्याशाळा वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी साडेतीन लाख रुपयांची तरतूदही करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या शाळेत ८ वर्गखोल्या असून, चौथीपर्यंतचे वर्ग भरवले जातात; मात्र इमारत धोकादायक बनल्याने वर्गखोल्यांमध्येच विद्यार्थी जीव मुठीत धरून धडे गिरवत होते. यामुळे पालकांचा जीवही टांगणीवर होता. वर्गखोल्यांच्या दयनीय अवस्थेमुळे विद्यार्थ्यांची पटसंख्यादेखील घटली आहे. धोकादायक वर्गखोल्यांबाबत शिक्षण विभागावर टीकेची झोड उठल्यानंतर धोकादायक इमारतीत भरवण्यात येणारे वर्ग थांबवण्यात आले आहेत. याच इमारतीसमोरील काही अंशी सुस्थितीत असलेल्या इमारतीत विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. एकीकडे कन्याशाळेच्या वर्गखोल्या पडझडीच्या उंबरठ्यावर असतानाही प्रशासनाला अखेर जाग आली आहे. डागडुजीकडे दुर्लक्ष करणाऱ्या कन्याशाळेच्या इमारतीत ३ मतदान केंद्रे आहेत.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर कन्याशाळेच्या तीन खोल्यांच्या दुरुस्तीकरिता साडेतीन लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचे कामदेखील सुरू झाले आहे.
पालकांना दिलासा
कन्याशाळेतील वर्गखोल्या कोसळण्याच्या परिस्थितीत होत्या. दुरुस्तीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत होते. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी परिसरातील तीन मतदान केंद्रे येथे निश्चित झाली. तशी वर्गखोल्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद झाली आणि शाळेच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले. पाल्यांच्या सुरक्षेबाबत चिंतेत असणाऱ्या पालकांचा अखेर जीव भांड्यात पडला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:27 PM 30/Oct/2024














