रत्नागिरी: कोकणच्या संस्कृतीतील अविभाज्य भाग असलेल्या होळी उत्सवाला सुरुवात झाली असून, रत्नागिरीचा अभिमान असलेल्या किल्ले रत्नदुर्ग येथील श्री भगवती देवीचा पारंपरिक होळी उत्सव आज, सोमवार २ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. यावर्षी उत्सवातील शांतता आणि शिस्त राखण्यासाठी भगवती देवस्थान कमिटीने एक महत्त्वाचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
असा असेल उत्सवाचा कार्यक्रम (दुपार ते मध्यरात्रीपर्यंत)
- दुपारी ३:०० वाजता: किल्लेकर ग्रामस्थ, देवस्थान ट्रस्टी आणि पदाधिकारी श्री मायनाक यांच्या मांडवी येथील निवासस्थानी होळी आणण्यासाठी प्रस्थान करतील.
- रात्री ११:३० वाजता: मांडवी येथून पारंपरिक पद्धतीने होळी तोडून ती वाजत-गाजत रत्नदुर्ग किल्ल्यावर आणली जाईल.
- मध्यरात्री: किल्ल्यावर होळीचे आगमन झाल्यानंतर विधिवत ‘होम’ प्रज्वलित करण्यात येईल.
वादावर तोडगा: देवस्थान कमिटीचा ‘पाठ’ ठेवण्याचा निर्णय
गेल्या काही वर्षांत होळी ताब्यात घेणे आणि ती पुढे नेण्यावरून होणारे वाद टाळण्यासाठी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष सुधाकर मोडकर यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
“होळीच्या मार्गावर जिथे सीमेवर होळी दिली जाते, तिथे यंदा देवस्थान कमिटीतर्फे एक ‘पाठ’ (Stand) ठेवण्यात येणार आहे. गावकऱ्यांनी त्या पाठावर होळी ठेवावी आणि दुसऱ्या गटाने तिथून ती आपल्या ताब्यात घेऊन पुढे न्यावी. यामुळे होळी हस्तांतरित करताना होणारे वाद संपुष्टात येतील,” असे मोडकर यांनी स्पष्ट केले.
या निर्णयाची पूर्वकल्पना सर्व गावकऱ्यांना देण्यात आली असून, सर्वांनी याला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाचे शांततेचे आवाहन
रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी संपूर्ण जिल्ह्यात होळीचा उत्सव शांततेत, आनंदाने आणि सुरक्षितरीत्या साजरा करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 02-03-2026














