देवरुख: “संगमेश्वर तालुक्यातील कसबा येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता नाही, मात्र सरकारमध्ये राजकीय इच्छाशक्तीचा अभाव जाणवत आहे,” अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. रविवारी सकाळी त्यांनी कसबा येथील प्रस्तावित स्मारक स्थळाला भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.
केवळ घोषणा नको, प्रत्यक्ष काम सुरू करा!
स्थानिक स्तरावर सातत्याने मागणी होत असतानाही स्मारकाच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही, याबद्दल सपकाळ यांनी तीव्र खंत व्यक्त केली. “पालकमंत्री आणि इतर नेते वारंवार स्मारकाबाबत घोषणा करतात, पण प्रत्यक्षात जमिनीवर काहीच घडताना दिसत नाही. जनतेमध्ये या दिरंगाईमुळे मोठी नाराजी आहे. दिलेला शब्द पाळून स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे,” अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
शिवस्मारकासारखी अवस्था होऊ देऊ नका
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रस्तावित स्मारकाचा दाखला देत सपकाळ म्हणाले की, “शिवस्मारकाची घोषणा होऊनही ते अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. कसबा येथील संभाजी महाराज स्मारकाचीही तशीच अवस्था होऊ नये, ही आमची भावना आहे. महाराजांचे जाज्वल्य विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हे स्मारक होणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे.”
दिग्गजांच्या भेटीनंतरही काम रखडलेलेच
तत्कालीन अर्थमंत्री आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनीही या ठिकाणचा आढावा घेतला आहे. तरीही काम रखडणे हे दुर्दैवी आहे. इतर भागांप्रमाणे या ऐतिहासिक स्थळाचाही विकास व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दौऱ्याच्या सुरुवातीला सपकाळ यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
दौऱ्यावेळी उपस्थित मान्यवर
या पाहणी दौऱ्याप्रसंगी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते, त्यामध्ये:
- नुरुद्दीन सय्यद (रत्नागिरी जिल्हाध्यक्ष)
- सोनलक्ष्मी घाग (उत्तर विभाग जिल्हाध्यक्षा)
- काशिनाथ वाजे (संगमेश्वर तालुका अध्यक्ष)
- फैज पाटणकर (माजी तालुका अध्यक्ष)
- तसेच मुरलीधर बोरसुतकर, चंद्रकांत कदम, दिलीप मोहिते व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 02-03-2026














