रत्नागिरी: कोकणच्या समृद्ध, पारंपरिक आणि काळाच्या पडद्याआड गेलेल्या ‘लॉस्ट रेसिपीज’चा वारसा जपण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ‘रत्नागिरी पाककला महास्पर्धा २०२६’ अत्यंत उत्साहात पार पडली. रत्नागिरीतील अंबर हॉल येथे झालेल्या या स्पर्धेत सौ. प्रज्ञा जयंत फडके यांनी बनवलेल्या ‘कायनाचं पिठलं’ या शिवकालीन आणि दुर्मिळ पाककृतीने अंतिम ‘महाविजेते’ पदावर आपले नाव कोरले.
जिल्ह्यात पहिल्यांदाच पार पडली ‘लाईव्ह’ पाककला स्पर्धा
मैत्री ग्रुपच्या वतीने आयोजित या स्पर्धेत दापोली, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर आणि रत्नागिरी शहरातून सुमारे १५० स्पर्धकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७५ महिलांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. विशेष म्हणजे, जिल्ह्यात पहिल्यांदाच ७५ महिलांनी परीक्षकांसमोर ‘लाईव्ह कुकिंग’ करून आपल्या पाककलेचा आविष्कार सादर केला. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत अंबर हॉलमध्ये कोकणी चवींचा अनोखा मेळ अनुभवायला मिळाला.
असे होते परीक्षणाचे निकष
हॉटेल कार्निव्हलचे संचालक उदय लोध, रस्टिक हॉलिडेजच्या संचालिका सौ. शिल्पा करकरे आणि नवनिर्माण हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रा. शेफ मेघना शेलार यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी पेलली. चव, सुगंध, पोत, साहित्य, कृती, स्वच्छता आणि सजावट या सात कडक निकषांवर पदार्थांचे परीक्षण करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल (Category-wise Winners):
| प्रवर्ग | क्रमांक | विजेत्याचे नाव | पाककृती (Dish) |
| महाविजेती | प्रथम | सौ. प्रज्ञा जयंत फडके | कायनाचं पिठलं (शिवकालीन) |
| शाकाहारी | प्रथम | सौ. श्रावणी संतोष मयेकर | चोळक्या भाकरी व हिंग चटणी |
| द्वितीय | सौ. सुलभा फणसळकर | खतखत | |
| तृतीय | सौ. विद्या विनायक शिर्के | ओल्या नारळाचे गोड वडे | |
| मत्स्याहारी | प्रथम | सौ. मीनाक्षी आतिष किर | खेकडा भुर्जी |
| द्वितीय | सौ. अंतरा राहुल कळंबटे | पानगा मासा | |
| तृतीय | सौ. अवंतिका राकेश तिवरेकर | झटपट मुळ्याचं कुवल | |
| मांसाहारी | प्रथम | सौ. स्वप्नाली संजय भागवत | मातीच्या भांड्यातील काळं चिकन |
| उत्तेजनार्थ | १ | सौ. साक्षी समीर चव्हाण | कुळथाची थाळी |
| २ | सौ. संगिता संदीप आंबेरकर | भरला बोंबील फ्राय |
“जुन्या रेसिपींचा दस्तऐवज बनवावा” – रमेश कीर
बक्षीस वितरण समारंभाला रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात ते म्हणाले की, “ही स्पर्धा गृहिणींना प्रतिष्ठा देणारी आहे. ‘डेस्टिनेशन रत्नागिरी’ अंतर्गत सर्व हॉटेल्सना या पारंपरिक रेसिपी मिळाव्यात आणि या जुन्या रेसिपींचा एक अधिकृत दस्तऐवज तयार करावा.”
मैत्री ग्रुपचे संचालक कौस्तुभ सावंत यांनी ‘शाकाहारी रत्नागिरी’ किंवा ‘चिकन रत्नागिरी’ या नावाने एक खास डिश प्रत्येक हॉटेलच्या मेनू कार्डमध्ये असावी, अशी संकल्पना मांडली. तर सुहास ठाकुरदेसाई यांनी या स्पर्धेमुळे कोकणच्या खाद्यसंस्कृतीला नवी ऊर्जा मिळाल्याचे सांगितले.
सन्मान आणि बक्षिसांचा वर्षाव
यावेळी सर्व स्पर्धकांना सुहाना मसाले यांच्यातर्फे भेटवस्तू देण्यात आल्या. राघव एंटरप्रायझेसकडून महाविजेत्याला विशेष भेट आणि सर्व स्पर्धकांना खरेदीवर ३०% सवलतीचे कूपन देण्यात आले. कार्यक्रमाला नमिता कीर, श्वेता काळोखे, महेश सावंत, भाई वायंगणकर, जयेश पटेल, श्रेयश सावंत, डॉ. नितीन सनगर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 02-03-2026














