रत्नागिरी : डिंगणी मार्गावर होतेय वाहतूककोंडी

संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणामुळे मुंबई, पुणेहून येणारे पर्यटक डिंगणी येथील रस्त्यावरून गणपतीपुळेला जातात. त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी वाढली आहे; मात्र डिंगणी येथे सीएनजी पंपावर होणाऱ्या वाहनांच्या गर्दीने वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण झालेला आहे. याकडे लक्ष देऊन वाहतूककोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी सुभाष लांजेकर यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

डिंगणी येथील रस्ता अरुंद व एक मार्गी आहे. या ठिकाणी सीएनजी पंपही आहे. या पंपावर गॅस भरण्यासाठी येणारी अवजड वाहने रस्त्याच्या दोन्ही बाजूस सतत उभी असतात. रस्त्याच्या दोन्हीकडील बाजूपट्टयाही खराब झालेल्या आहेत. परिणामी, येथे सतत वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो तसेच गॅस भरण्यासाठी येणारी कार, रिक्षा आदी वाहनेही रस्त्यावरच उभी असतात. या परिसरातून जाणाऱ्या एसही व इतर वाहनांना ये-जा करण्यासाठी जागाच राहत नाही. गणपती, दिवाळी, शिमगा यासारख्या सणात व सुट्टीत रस्त्यावर वाहतू‌ककोंडी होते.

त्यामुळे अपघात किंवा हाणामारीचे प्रसंग वारंवार उद्भवत आहेत. ही समस्या सोडवण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्टया जांभा किंवा डबर टाकून वाढवणे आवश्यक आहे तसेच पंपामध्ये येणाऱ्या वाहनांना जागा उपलब्ध करून देण्याविषयी संबधित यंत्रणेला आदेशित करून योग्य ती कार्यवाही करून सहकार्य करावे, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे फुणणूस येथील लांजेकर यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 30/Oct/2024