संगमेश्वर: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील करंजाळी परिसरात एका दुचाकीचा भीषण अपघात झाला असून, या दुर्घटनेत एका ५५ वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. महामार्गावरील बंद असलेल्या लेनमध्ये दुचाकी नेल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या चालकावर विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८ च्या सुमारास सदाशिव लक्ष्मण चव्हाण (वय ५५, रा. मठ-लांजा) हे श्रवणकुमार मांगीलाल परमार (वय २७, रा. पाली) याच्यासोबत ‘पॅशन प्रो’ मोटारसायकलवरून (क्रमांक MH 08 AT 8239) देवळे येथून पालीच्या दिशेने जात होते.
जिव्हाळा हॉटेलजवळ (करंजाळी) पोहोचल्यावर, महामार्गाची परिस्थिती लक्षात न घेता चालक श्रवणकुमार याने आपली गाडी हयगयीने चालवत बंद असलेल्या लेनमध्ये नेली. तेथे असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर गाडी आदळून स्लिप झाली. या भीषण अपघातात मागे बसलेले सदाशिव चव्हाण गाडीवरून फेकला गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेत चालक श्रवणकुमार हादेखील जखमी झाला आहे.
२१ दिवसांनंतर पोलिसांत फिर्याद
अपघाताच्या या घटनेनंतर तब्बल २१ दिवसांनी, म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी मयत सदाशिव चव्हाण यांचे चिरंजीव रितेश सदाशिव चव्हाण (वय ३१) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या विलंबामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, पोलिसांनी फिर्यादीवरून तत्काळ कारवाई केली आहे.
चालकावर ‘भारतीय न्यायसंहिते’नुसार गुन्हा
संगमेश्वर पोलिसांनी आरोपी चालक श्रवणकुमार परमार याच्याविरुद्ध खालील कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे:
- भारतीय न्यायसंहिता २०२३: कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब).
- मोटार वाहन कायदा: कलम १८४.
तपासाची स्थिती: या प्रकरणाचा अधिक तपास संगमेश्वर पोलीस करत असून, महामार्गावरील कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना होत्या का, याचाही शोध घेतला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:45 02-03-2026














