चिपळूण: कोकणचा सण म्हटलं की ‘शिमगा’ आणि या उत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे. चिपळूण तालुक्यातील मिरजोळी येथील ग्रामदेवता श्री देवी महालक्ष्मी साळूबाईचा शिमगोत्सव उद्या, ३ मार्च पासून मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या उत्सवासाठी गावात जय्यत तयारी करण्यात आली असून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पालखी पूजन आणि उत्सवाचा प्रारंभ
उत्सवाची सुरुवात २ मार्च रोजी रात्री १० वाजता श्री देवी महालक्ष्मी साळूबाई मंदिर परिसरातील सहाणेवर पालखी सजवून करण्यात येईल. त्यानंतर ३ मार्च रोजी पहाटे ५ वाजता मंदिराजवळ ‘भद्री होम’ झाल्यानंतर पालखीची मिरवणूक पवारवाडीच्या दिशेने मार्गस्थ होईल.
विविध वाड्यांमध्ये पालखीचे आगमन (वेळापत्रक)
ग्रामदैवतेची पालखी गावातील विविध वाड्यांमध्ये जाऊन भक्तांच्या भेटीला येणार आहे. त्याचे नियोजन खालीलप्रमाणे आहे:
- ४ मार्च: सकाळी ७ वाजल्यापासून भोरजेवाडी, ब्राम्हणवाडी, खोरीवाडी, वरची पवारवाडी आणि खालची पवारवाडी येथे पालखीचे आगमन होईल. त्यानंतर रोहिदास वाडी येथे आरत्या स्वीकारून पालखी उक्ताडकडे प्रयाण करेल.
- ५ मार्च: कानसेवाडी, भोसले घर, बडदेवाडी, कांगणेवाडी आणि गणपती मंदिर परिसरात पालखीचे वास्तव्य असेल.
- ६ मार्च: कांगणेवाडीनंतर पेटकर, गोंजारे चाळ, कोळखेखाजन आणि चिपळूणकरवाडी येथील सहाणेवर आरत्या होतील. त्यानंतर महालक्ष्मी नगर आणि गोडेबाबा आंब्याजवळ पालखी येईल.
- ७ मार्च: महालक्ष्मी रेसिडेन्सी, जाखमाता मंदिर परिसर, गणपती मंदिर ते मारुती मंदिर चौकीपर्यंत पालखी फिरणार आहे. रात्री ११ नंतर जाखमाता मंदिर परिसरात भक्तांच्या आरत्या व नवस स्वीकारले जातील.
उत्सवाची सांगता
८ मार्च रोजी सकाळी ६ वाजल्यापासून मारुती मंदिर, संसारे नाका, खंड भाटिया गॅरेज ते खंड चौकी या मार्गे पालखी जुना गुहागर नाक्यापर्यंत येईल. त्यानंतर उक्ताड येथील खेराडे यांच्या अंगणात विसावा घेऊन मिरवणुकीने पालखी पुन्हा श्री देवी महालक्ष्मी साळूबाई मंदिरात दाखल होईल. रात्री १२ नंतर मंदिर परिसरातील सहाणेवर ‘ललिताने’ या उत्सवाची सांगता होईल, अशी माहिती ट्रस्ट कमिटीने दिली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:45 02-03-2026














