सावर्डे : संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते कुंभारखाणी बुद्रुक या दहा किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील मोऱ्या व रस्त्याची दुरवस्था झाली आहे. येथील रस्ता दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येते; मात्र प्रत्यक्षात दुरुस्ती केली जात नाही. पावसाळ्यात येथील मोऱ्या खचण्याचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून, वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागते. याकडे दुर्लक्ष होत असताना प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबई-पणजी महामार्गावर आरवली इथून पूर्वेस हा रस्ता येडगेवाडीपर्यंत जातो, रस्त्यावर मुरडव, कुंभारखाणी बुद्रुक, कुचांबे, कोंडभैरव, राजिवली व येडगेवाडी ही गावे येतात. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारितील पंचवीस किलोमीटर लांबीचा हा रस्ता कुचांबे येथील गड नदीवरील मध्यम पाटबंधारे प्रकल्पामुळे अधिक रहदारीचा बनला आहे. त्या मानाने खात्याकडून रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्यात कुंभारखाणी बुद्रुक येथील बेणेरे, चर्मकारवाडी, कोड हुंबरठ ग्रामदेवत्ता मंदिर, मधलीवाडी सहाण व कोंड टाके येथील मोऱ्या मोडकळीस आल्या आहेत. तासभर अतिवृष्टी झाली की, या मोऱ्या लगेच पाण्याखाली जातात. त्यामुळे पाऊस थांबपर्यंत वाहतूक बंद पडते. यंदा पावसाळ्यात चर्मकारवाही नजीकच्या मोरीला रस्त्याच्या मध्यभागीच भगदाड पडले होते. परिणामी, दोन दिवस वाहतूक बंद पडली होती. या मोरी नव्याने बांधून त्यांची उंची वाढवण्याची आवश्यकता आहे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
या भागातील रस्त्याची अवस्थाही धोकादायक आहे. रस्त्याच्या बाजूने गडनदी वाहत असल्याने मुरडव सीमा ते बेणेरे मोरीदरम्यान रस्ता वाहून गेला असून, ठिकठिकाणी चाळण झाली आहे. या अवस्थेमुळे एसटी बस नेण्यास चालक धजावत नाहीत. प्रवाशांना खासगी वाहनांची मदत घ्यावी लागते. त्यामुळे जादा भाड्याचा भुर्दडही सहन करावा लागतो. त्यामुळे ग्रामस्थांची कोंडी झाली आहे. याबाबत कोणीच भूमिका घेत नसल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.
कुंभारखाणी बुद्रुक हायस्कूलजवळ रस्त्याची चाळण झाली आहे. पावसाळ्यात मुलांच्या अंगावर चिखलयुक्त पाण्याचा फवारा उडतो संबंधित खात्यावर दबाव नसल्याने केवळ रस्त्याची थातूरमातूर डागडुजी केली जाते या पद्धतीने जर सर्वचजण करत राहिले तर जनता मतदानावर बहिष्कार घालण्याचा विचार करेल. संजय शिंदे, कुंभारखाणी बुद्रुक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:53 PM 30/Oct/2024














