राजापूर: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील वडवली बौद्धवाडी येथे एका अज्ञात चोरट्याने बौद्धविहाराचा दरवाजा तोडून घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमध्ये सार्वजनिक मंडळाची तांबा, पितळ आणि स्टीलची भांडी चोरून नेण्यात आली असून, याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, वडवली बौद्धवाडी येथील बौद्धविहाराची २८ ऑक्टोबर २०२४ रोजी साफसफाई करण्यात आली होती. त्यानंतर विहारातील तांबा, पितळ आणि स्टीलची भांडी घासून स्वच्छ करून विहाराला कुलूप लावण्यात आले होते. मात्र, २८ फेब्रुवारी २०२६ ते २ मार्च २०२६ या कालावधीत विहाराचे कोणीही नसताना अज्ञात चोरट्याने विहाराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला.
सोमवारी, २ मार्च रोजी रात्री ८:३० वाजताच्या सुमारास फिर्यादी गौतम विश्राम जाधव आणि मंडळाचे इतर सदस्य विहाराची साफसफाई करण्यासाठी गेले असता, त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. विहारातील मौल्यवान भांडी गायब असल्याचे पाहून त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली.
काय काय चोरीला गेले?
अज्ञात चोरट्याने विहारातून खालील वस्तू चोरून नेल्या आहेत:
- पितळेची पाण्याची टाकी: सुमारे २५ किलो वजनाची (किंमत २००० रुपये)
- तांब्याची पातेली: ५० किलो आणि १५ किलो वजनाची दोन जुनी पातेली (एकूण किंमत ५२०० रुपये)
- स्टीलची भांडी: ४० ताटे आणि २० ग्लास (किंमत १६०० रुपये)
- पितळी कुलूप: १ किलो वजनाचे (किंमत ८० रुपये) असा एकूण ८,८८० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.
पोलिस कारवाई:
याप्रकरणी फिर्यादी गौतम विश्राम जाधव (वय ४५, रा. मिरजोळे, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ (अ) अन्वये गुन्हा (क्र. ४५/२०२६) दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.













