चिपळूण:
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये एका तरुणाचे कारमधून अपहरण करून त्याला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ नुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मजरेकाशी मोहल्ला येथील रहिवासी फैजान अब्दुलकादीर करजीकर (वय ३४) यांना आरोपींनी २५ फेब्रुवारी रोजी ‘दारुलकजा’ येथे बोलावले होते. मात्र, फैजान तेथे गेले नाहीत. याच कारणाचा राग मनात धरून सोमवारी, २ मार्च २०२६ रोजी पहाटे ५:३० वाजता ही घटना घडली.
मिरजोळी येथील साजीद सरगुरोह यांच्या कंपनीच्या कंपाउंडचे गेट उघडत असताना, आरोपींनी पाठीमागून इनोव्हा कार (क्र. १९९९) आणली. आरोपींनी फैजान यांना जबरदस्तीने गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले.
प्रवासादरम्यान बेदम मारहाण
अपहरण केल्यानंतर आरोपींनी फैजान यांना मिरजोळी, वालोपे, लोटे आणि पुन्हा चिपळूण अशा विविध ठिकाणी फिरवले. या प्रवासादरम्यान आरोपींनी फिर्यादीला हाताच्या बुक्क्यांनी बेदम मारहाण केली, ज्यामध्ये फैजान यांना गंभीर दुखापत झाली आहे.
गुन्हा दाखल असलेले आरोपी:
१) ताबीश पेचकर (रा. गोवळकोट रोड, चिपळूण)
२) समिर पेचकर (रा. गोवळकोट रोड, चिपळूण)
३) मुस्कान दलवाई (रा. गोवळकोट रोड, चिपळूण)
४) अमान नाडकर (रा. खेड)
पोलीस कारवाई:
या प्रकरणी जखमी फैजान करजीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून चिपळूण पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११५(२), १४०(३) आणि ३(५) अन्वये गुन्हा (रजि. नं. ५९/२०२६) दाखल केला आहे. भरदिवसा घडलेल्या या अपहरणाच्या घटनेमुळे चिपळूण परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:46 04-03-2026













