राजापूर : सोलगाववासीयांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा विद्यार्थ्यांनी दिला संदेश

राजापूर : तालुक्यातील सोलगाव येथील जिल्हा परिषद आदर्श शाळा नं. २ मधील विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून सुगंधी उटणे तयार केले. त्या उटण्याच्या साह्याने विद्यार्थ्यांच्या घरासह गावामधील लोकांची दिवाळी पहाटे सुगंधित झाली. या सुगंधी उटण्यासोबत प्रशालेने साऱ्यांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संदेशही दिला.

विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास व्हावा, या उद्देशाने सोलगाव येथील शाळेमध्ये प्रशाळेचे मुख्याध्यापक दीपक धामापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविधांगी उपक्रम राबवले जातात. त्याप्रमाणे दिवाळीनिमित्ताने आकाशकंदिलासह अन्य विविध वस्तू बनविताना सुगंधी उटणीही विद्यार्थ्यांनी तयार केली. सुगंधी उटणे तयार करण्यासाठी प्रशालेमध्ये झालेल्या कार्यशाळेत मुख्याध्यापक धामापूरकर यांनी उटणे नेमके कसे तयार करावे, याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवले. त्यानंतर, विद्यार्थ्यांनी धामापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुंगंधी उटणी तयार करून परिसरातील ग्रामस्थांसह दुकानदारांना वितरित केली. या उटण्याच्या साह्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची दिवाळीची पहिली पहाट सुगंधित होईल.

या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मानसी आईर, रूंजी नागरेकर, कोमल आईर, श्रद्धा बाणे, विदिशा परवडी, अपेक्षा नांगरेकर, पुष्पमाला नांगरेकर, शिक्षक लक्ष्मण फडतरे, विशाल सकाळ, वाडीतील पालक, ग्रामस्थ यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. केंद्रप्रमुख लक्ष्मण फाटक यांच्यासह ग्रामस्थांकडून या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 30/Oct/2024