गुहागरमध्ये बोलेरो पिकअप उलटून भीषण अपघात; उत्तर प्रदेशातील तरुणाचा मृत्यू

गुहागर:
गुहागर तालुक्यातील आबलोली-तवसाळ मार्गावर भरधाव बोलेरो पिकअपवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एका २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर तिघे जखमी झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेले सुनील संतराम वर्मा (वय २५) हे या अपघातात मरण पावले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तवसाळ येथील अशोका बिल्डकॉन कंपनीजवळ आरोपी चालक मेहेरतेज दिवाकर गुडेला हा आपली बोलेरो पिकअप (क्रमांक RJ-47-GA-8386) अतिवेगाने चालवत होता. अचानक स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली.

या अपघातात फिर्यादी रवींद्र यादव, तलत अहमद खान आणि उपेंद्र यादव हे जखमी झाले आहेत. चालक मेहेरतेज यालाही किरकोळ दुखापत झाली असून, त्याच्या विरोधात गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत सुनील वर्मा यांच्या निधनाने त्यांच्या मुळ गावी खळबळ उडाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 05-03-2026