रिफायनरी न लादता स्थानिकांच्या भूमिकेचा विचार : उद्योगमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्पाविरोधातील बळीराजा सेनेचे अध्यक्ष अशोक वालम यांची मी मुख्यमंत्र्यांशी भेट घालून दिली. रिफायनरी जबरदस्तीने आम्ही लादणार नाही. स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्पाबाबत विचार करू, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. यावर निर्णय घेण्यासाठी वालम यांच्यासह अन्य स्थानिकांशी चार दिवसांत चर्चा करणार आहे.

त्यात रिफायनरीबाबत निर्णय घेतला जाईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सामंत म्हणाले, विधानसभा निवडणुकीत आता २० तारखेपर्यंत अशाच घडामोडी होत राहणार. शिवसेनेला अनेकजण पाठबळ देत आहेत. रिफायनरी प्रकल्पाविरोधी संघर्ष समितीमध्ये पुढाकार घेतलेले आणि त्यानंतर बळीराजा सेना पक्षाची स्थापना केलेले अशोक वालम यांच्याशी काही दिवसांपूर्वी मुंबईत बैठक झाली होती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मी आणि अशोक वालम यांच्यात चर्चा झाली. यापूर्वी कोणी रिफायनरी रद्द केल्याबाबतचे पत्र काढले, त्यानंतर बारसूला जमीन असल्याचे पत्र केंद्राला कुणी दिले. या खोलात मला जायचे नाही. परंतु रिफायनरी प्रकल्प स्थानिकांवर लादायचा नाही, अशी आमची भूमिका असल्याने एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी येत्या चार दिवसांत पुन्हा मुख्यमंत्र्यांबरोबर वालम आणि स्थनिकांशी चर्चा घडवून आणली जाईल स्थानिकांचा विरोध असले तर त्याबाबत मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. असेही सामंत यांनी सांगितले.

प्रथमेश गावणकर लगेच उपतालुकाप्रमुख
जिजाऊ सामाजिक संघटनेतील प्रथमेश गावणकर यांनी धनुष्यबाण हाती घेत शिवसेनेत सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे मंत्री उदय सामंत यांनी स्वागत केले. सामंत यांनी त्यांचा शिवसेना पक्षात सन्मान करत तत्काळ रत्नागिरी तालुक्याचे उपतालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:40 PM 30/Oct/2024