मार्चमध्येच सूर्यदेव आग ओकतोय! रत्नागिरीचा पारा ३६ अंशांवर; कडक उन्हामुळे नागरिक हैराण

रत्नागिरी: थंडीचा कडाका ओसरल्यानंतर आता मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात रत्नागिरीकरांना तीव्र उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत. बुधवारी आणि गुरुवारी जिल्ह्याचे तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून, वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. आगामी काळात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

रत्नागिरीत उन्हाचा तडाखा: दुपारचे रस्ते सामसूम

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्याने आपले रौद्र रूप दाखवण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजल्यापासूनच घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या आणि दुपारी उन्हाचे चटके तीव्रतेने जाणवत होते. कडक उन्हामुळे नागरिक दुपारी घराबाहेर पडणे टाळत असून, शहरातील प्रमुख रस्ते सामसूम पाहायला मिळत आहेत. घराबाहेर पडताना नागरिक तोंडाला रुमाल, स्कार्फ, गॉगल्स आणि टोपीचा वापर करून स्वतःचा बचाव करत आहेत.

शेतीवर हवामान बदलाचा परिणाम

यंदाचा पावसाळा सहा महिने लांबल्याने खरीप पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये कडाक्याची थंडी पडली, मात्र फेब्रुवारीतील सततच्या हवामान बदलामुळे आंबा आणि काजू पिकांना मोठा फटका बसला आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मोहर करपल्यामुळे यंदाचा हापूस हंगामा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

थंड पेयांच्या दुकानांत गर्दी

वाढत्या उष्म्यापासून सुटका मिळवण्यासाठी रत्नागिरीकर आता थंड पेयांकडे वळले आहेत. शहरातील नारळपाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत, कोल्ड्रिंक्स आणि विविध फळांच्या रसांच्या स्टॉल्सवर ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. तसेच आईस्क्रीम खाण्यासाठीही लहान मुलांपासून थोरांपर्यंत सर्वांची पावले दुकानांकडे वळत आहेत.


महत्त्वाचे मुद्दे:

  • तापमान: जिल्ह्याचा पारा ३६ ते ३९ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता.
  • एप्रिल-मे चे संकेत: येणारे एप्रिल आणि मे महिने अधिक उष्णतेचे आणि घामाघूम करणारे असतील.
  • हवामान अंदाज: पुढील चार दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:44 06-03-2026