रत्नागिरी: शहरातील गजबजलेल्या मिरकरवाडा जेटी परिसरात पूर्ववैमनस्यातून एका मच्छिमारावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, या हल्ल्यात जयेंद्र दत्ताराम नार्वेकर (वय ५५) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी ‘छोटा भाई’ ऊर्फ रुपेश सावंत याच्यासह तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी जयेंद्र नार्वेकर (रा. भाट्ये-मिऱ्या) हे आपल्या मोटारसायकलने (क्र. MH 08/BF/2323) बोटीच्या कामासाठी मिरकरवाडा जेटीकडे जात होते. जेटीच्या पहिल्या गेटजवळ पोहोचले असता, आरोपी शशांक सावंत आणि संजू (पूर्ण नाव माहिती नाही) यांनी आपली दुचाकी आडवी लावून नार्वेकर यांना अडवले.
जुना वाद आणि प्राणघातक हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, १ मार्च रोजी भाट्ये-मिऱ्या येथील दत्तमंदिर परिसरात झालेल्या किरकोळ भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. याच रागातून आरोपींनी नार्वेकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपी शशांक व संजू यांनी चाकू काढून जीवे मारण्याची धमकी दिली.
त्याच वेळी आरोपी रुपेश कमलाकर सावंत ऊर्फ ‘छोटा भाई’ तिथे आला. त्याने आपल्याकडील चाकूने जयेंद्र नार्वेकर यांच्या पाठीवर, कमरेवर, खांद्यावर, हात आणि पोटावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात नार्वेकर रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.
रुग्णालयात उपचार आणि पोलीस कारवाई
गंभीर जखमी झालेल्या नार्वेकर यांना तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीची गंभीर दखल घेत पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांचा जबाब नोंदवला.
या कलमान्वये गुन्हे दाखल: रत्नागिरी शहर पोलिसांनी या प्रकरणी ७ मार्च रोजी दुपारी ४ वाजता भारतीय न्यायसंहिता २०२३ (BNS) च्या खालील कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे:
- कलम १०९: जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder)
- कलम १२६(२), ३५१(३), ३५२ आणि ३(५)
तपास सुरू: घटनेनंतर तिन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले आहेत. पोलीस पथके आरोपींच्या मागावर असून सडा-मिऱ्या परिसरातील संशयितांचा कसून शोध घेतला जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:29 09-03-2026














