Rajapur: तेरवण येथे खैराच्या झाडांची चोरी; ४ नेपाळी कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल

राजापूर: तालुक्यातील तेरवण येथे सामायिक जमिनीतील खैराची झाडे विनापरवाना तोडून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी ४ अज्ञात नेपाळी कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुभाष हरिश्चंद्र सरफरे (वय ६१, रा. भ. सरफरेवाडी) यांची तेरवण येथे सर्वे नं. १५/०१ मध्ये सामायिक जमीन आहे. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. विशाल विजय सरफरे यांच्याकडे काम करणाऱ्या ४ नेपाळी कामगारांनी फिर्यादीची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जमिनीतील खैराची झाडे तोडली. स्वतःच्या फायद्यासाठी लबाडीच्या इराद्याने ही ७ झाडे खणून चोरून नेण्यात आली.

वनविभागाचा पंचनामा आणि किंमत

या चोरीबाबत माहिती मिळताच वनपालांमार्फत संबंधित जागेचा रीतसर पंचनामा करण्यात आला. वनविभागाने दिलेल्या अहवालानुसार, चोरीला गेलेल्या खैराच्या ७ झाडांची एकूण किंमत ६ हजार ५७२ रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.

पोलीस कारवाई आणि कलमे

अनेक दिवस उलटूनही झाडांबाबत कोणतीही दाद न मिळाल्याने अखेर सुभाष सरफरे यांनी ७ मार्च रोजी राजापूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ४ अज्ञात नेपाळी कामगारांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२) आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

संशयितांचा शोध सुरू

हे संशयित आरोपी एका स्थानिक व्यक्तीकडे कामाला असल्याचे समोर आले आहे. या चोरीच्या घटनेमुळे सामायिक जमिनींच्या मालकी हक्काबाबत आणि झाडतोडीबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. राजापूर पोलीस या फरार कामगारांचा शोध घेत असून अधिक तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:53 09-03-2026