रत्नागिरी: चिपळूणच्या राजकारणातील अनुभवी नेतृत्व आणि चिपळूण अर्बन बँकेचे संचालक समीर टाकळे यांची भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा चिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी नुकतीच ही घोषणा करत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
शिवसेनेचा ‘निष्ठावंत’ चेहरा आता भाजपमध्ये
चिपळूणमध्ये शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून समीर टाकळे यांची ओळख आहे. त्यांनी अखंड शिवसेनेचे उपशहरप्रमुख म्हणून दीर्घकाळ काम केले असून, शहरातील राजकारणात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. मात्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कार्यकर्त्यांची होत असलेली कुचंबणा आणि अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी महिनाभरापूर्वी प्रशांत यादव यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये प्रवेश केला होता.
राजकारणातील मोठा अनुभव
- बँकिंग क्षेत्र: चिपळूण अर्बन बँकेचे संचालक म्हणून ते कार्यरत आहेत.
- राजकीय वारसा: त्यांनी स्वतः नगरपालिकेची निवडणूक लढवली आहे, तसेच नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांच्या कन्या डॉ. सानिका टाकळे यांनीही निवडणूक लढवत सक्रिय राजकारणात पाऊल ठेवले आहे.
- जनसंपर्क: सर्वसामान्यांच्या अडीअडचणींना धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची चिपळूणमध्ये ख्याती आहे.
प्रशांत यादव यांच्याकडून विश्वास
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली. समीर टाकळे यांच्याकडे असलेले संघटनकौशल्य आणि काम करण्याची पद्धत लक्षात घेऊन त्यांना जिल्हा स्तरावर संधी देण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे चिपळूण शहरासह जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक तापक वाढण्यास मदत होणार आहे.
पक्षातील नव्या जबाबदारीवर प्रतिक्रिया
“पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि भाजपचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कार्यरत राहीन,” अशा शब्दांत समीर टाकळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:05 09-03-2026














