मुंबई: घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि तितकीच काळजी वाढवणारी बातमी आहे. तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी (LPG) सिलिंडर बुकिंगच्या नियमात मोठा बदल केला असून, आता दोन सिलिंडर बुक करण्यामधील किमान कालावधी थेट २५ दिवसांवर नेला आहे. ७ मार्च २०२६ पासून हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत.
नेमका बदल काय?
आतापर्यंत ग्राहकांना १५ दिवसांच्या अंतराने दुसरा सिलिंडर बुक करता येत होता. मात्र, नवीन नियमानुसार आता एकदा सिलिंडर डिलिव्हरी झाल्यानंतर, पुढील बुकिंग करण्यासाठी ग्राहकांना २५ दिवस वाट पाहावी लागणार आहे. जर एखादा ग्राहक या मर्यादेपूर्वी बुकिंग करण्याचा प्रयत्न करेल, तर सिस्टम ते बुकिंग स्वीकारणार नाही.
नियम बदलण्यामागचे मुख्य कारण
सध्या सुरू असलेल्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीचा फायदा घेऊन घरगुती सिलिंडरचा काळाबाजार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
- किंमत वाढ: घरगुती गॅसच्या किमतीत नुकतीच ६० रुपयांची वाढ झाली असून, भविष्यात हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.
- साठेबाजीला लगाम: किमती वाढणार या भीतीने अनेक ग्राहक सिलिंडरचा साठा करत आहेत किंवा घरगुती सिलिंडर हॉटेल व्यावसायिकांना विकले जात आहेत. हे रोखण्यासाठी कंपन्यांनी बुकिंगचा ‘वेटिंग पिरियड’ वाढवला आहे.
७ मार्चपासून अंमलबजावणी
अनेकांकडे दोन सिलिंडरची जोडणी असते. अशा ग्राहकांनी १५ दिवस पूर्ण झाल्यावर बुकिंगचा प्रयत्न केला असता, त्यांना १६-१७ व्या दिवशीही बुकिंग करता येत नव्हते. अखेर ९ मार्चला कंपन्यांनी अधिकृतपणे स्पष्ट केले की, डिलिव्हरीपासून २५ दिवसांचा गॅप असणे बंधनकारक आहे.
नवीन नियमांचे फायदे आणि परिणाम:
- काळ्याबाजारावर नियंत्रण: घरगुती गॅसचा व्यावसायिक (हॉटेल/कंपन्या) कामांसाठी होणारा अवैध वापर कमी होईल.
- समान वितरण: गॅसच्या मागणीचा दबाव कमी होऊन रांगेत असलेल्या गरजू ग्राहकांना लवकर सिलिंडर मिळण्यास मदत होईल.
- हॉटेल उद्योगावर परिणाम: कमर्शियल गॅसवर आधीच निर्बंध असल्याने आणि आता घरगुती गॅस मिळणे कठीण झाल्याने हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणी वाढणार आहेत.
ग्राहकांसाठी महत्त्वाच्या टिप्स:
- आपल्या गॅस वापराचे नियोजन करा, जेणेकरून २५ दिवसांच्या मर्यादेमुळे तुमची गैरसोय होणार नाही.
- गॅस एजन्सीकडून येणाऱ्या अधिकृत मेसेजवर लक्ष ठेवा.
- अफवांवर विश्वास ठेवू नका, केवळ बुकिंगच्या कालावधीत बदल झाला असून पुरवठा पूर्णपणे बंद झालेला नाही.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:31 09-03-2026













