रत्नागिरीत सुरावटींचा जागर! कै. मिलिंद टिकेकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त ‘संगीत संक्षिप्त मानापमान’चे सादरीकरण

रत्नागिरी (प्रतिनिधी):
रत्नागिरीतील हरहुन्नरी शिक्षक, दिग्दर्शक आणि तबलावादक कै. मिलिंद टिकेकर यांच्या पाचव्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ‘मधुमिलिंद प्रतिष्ठान’ने याही वर्षी कलेची परंपरा जपली आहे. वेगळेपणाचा आणि सृजनाचा ध्यास घेतलेल्या मिलिंद टिकेकर यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दिनांक १५ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता सावरकर नाट्यगृह येथे ‘संगीत संक्षिप्त मानापमान’ या अजरामर नाट्यकृतीचे सादरीकरण होणार आहे.

गेल्या चार वर्षांपासून मधुमिलिंद प्रतिष्ठान, रत्नागिरी या संस्थेमार्फत टिकेकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी नवनवीन कलाकृतींचे सादरीकरण केले जाते. याच परंपरेचा एक भाग म्हणून यंदा या संगीत नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

नाट्यकृतीचे स्वरूप आणि कलाकार
‘तपस्या’ या संस्थेमार्फत या नाट्यकृतीची निर्मिती करण्यात आली आहे. रंगमंचावर इतिहास घडवणाऱ्या ‘संगीत मानापमान’ या नाटकाचे संक्षिप्त स्वरूपात पुनर्लेखन आणि दिग्दर्शन श्री. विलास हर्षे यांनी केले आहे. या अभिनव प्रयोगामध्ये रत्नागिरीतील नामांकित कलाकार आपला अभिनय आणि गायन सादर करणार आहेत.

प्रमुख कलाकार: श्री. स्वप्नील गोरे, सौ. श्वेता जोगळेकर, सौ. मधुरा लाकडे आणि श्री. मोहन बापट.

संगीत साथ: श्री. विलास हर्षे (ऑर्गन) आणि श्री. हेरंब जोगळेकर (तबला).

प्रवेश विनामूल्य: आस्वाद घेण्याचे आवाहन
रत्नागिरी हे सांस्कृतिक शहर असून येथील नाट्य आणि संगीत प्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी असणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त रसिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कलाकारांना प्रोत्साहन द्यावे आणि या संगीत नाट्यकृतीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मधुमिलिंद प्रतिष्ठान, रत्नागिरीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:51 09-03-2026