मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) सदस्य सचिव आणि २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्यावरील निलंबनाची कारवाई अखेर रद्द करण्यात आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर ही कारवाई मागे घेण्यात आल्याचे समजते. मंत्री सामंत यांच्या पुढाकारामुळे एम. देवेंद्र सिंग यांना मोठे अभय मिळाले आहे.
रत्नागिरीतील कामाची मिळाली पावती
एम. देवेंद्र सिंग यांनी यापूर्वी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून अत्यंत प्रभावी काम केले होते. या काळात मंत्री उदय सामंत यांच्यासोबत विविध विकासकामांच्या निमित्ताने सिंग यांना काम करण्याची संधी मिळाली होती. रत्नागिरीतील त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची आणि कामाची दखल घेऊनच, मंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणात मध्यस्थीची भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे.
काय होते नेमके प्रकरण?
चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषण पातळीच्या समस्येबाबत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी महत्त्वपूर्ण बैठकांचे आयोजन केले होते. मात्र, या बैठकांना एमपीसीबीचे वरिष्ठ अधिकारी सातत्याने अनुपस्थित राहत असल्याचा मुद्दा पंकजा मुंडे यांनी विधानसभेत मांडला होता.
मंत्री महोदयांच्या आदेशानंतरही एम. देवेंद्र सिंग ‘ब्रीफिंग’साठी हजर न राहिल्याने, विधानसभेचे तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. या आदेशानुसार सामान्य प्रशासन विभागाने सिंग आणि सहसंचालक सतीश पडवळ यांच्यावर कारवाई केली होती.
निलंबन मागे घेण्यामागील कारणे
मंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीनंतर प्रशासकीय स्तरावर चर्चा होऊन एम. देवेंद्र सिंग यांच्यावरील कारवाई मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सिंग यांचा प्रशासकीय अनुभव आणि रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात त्यांनी दिलेली कामगिरी यांमुळे त्यांना ही दिलासादायक बातमी मिळाली आहे. या निर्णयामुळे आता एम. देवेंद्र सिंग पुन्हा एकदा आपल्या पदावर रुजू होऊन एमपीसीबीच्या कामकाजात सक्रिय होतील.













