चिपळूण: नगर परिषदेच्या व्यावसायिक गाळेधारकांना ३० वर्षे मुदतवाढ द्या; इनायत मुकादम यांची मागणी

चिपळूण: चिपळूण नगर परिषदेच्या मालकीच्या इमारतींमधील व्यावसायिक गाळेधारकांसाठी माजी नगरसेवक इनायत मुकादम यांनी महत्त्वाची मागणी लावून धरली आहे. भाजी मंडईतील गाळेधारकांप्रमाणेच इतर व्यावसायिक गाळेधारकांनाही मूळ भाडेकरारानुसार पुढील ३० वर्षांसाठी मुदतवाढ मिळावी, असे निवेदन त्यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.

भाजी मंडईच्या धर्तीवर निर्णयाची मागणी

इनायत मुकादम यांनी निवेदनात नमूद केले की, आरक्षण क्र. ४० येथील भाजी मंडईतील १० गाळेधारकांना शासनाकडून ३० वर्षांसाठी मुदतवाढ देण्याबाबत पत्र प्राप्त झाले आहे. ज्या निकषांवर या गाळेधारकांना दिलासा मिळाला, त्याच धर्तीवर शहरातील इतर संकुलांमधील गाळेधारकांनाही न्याय मिळावा, अशी त्यांची भूमिका आहे.

या संकुलांचा समावेश करण्याची मागणी:

  • इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र
  • पवन तलाव स्टेडियम
  • एल टाईप शॉपिंग सेंटर
  • विरेश्वर तलाव येथील व्यायामशाळा

नगर परिषद अधिनियमानुसार स्थानिक पातळीवर केवळ ९ वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार आहेत, परंतु त्यापुढील मुदतवाढीसाठी शासनाची मान्यता आवश्यक असते. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तातडीने शासनाकडे यासंदर्भात प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:01 09-03-2026