वारकरी संप्रदायाची बदनामी करणारे ‘ईठ्ठला’ नाटक अखेर स्थगित; नाव आणि कथानक बदलण्याचे निर्मात्यांचे लेखी आश्वासन

मुंबई: वारकरी संप्रदाय, संत परंपरा आणि विठ्ठल भक्तीची विटंबना केल्याचा आरोप असलेल्या ‘ईठ्ठला’ या नाटकाचे सादरीकरण राज्यभर वाद निर्माण झाल्यानंतर अखेर स्थगित करण्यात आले आहे. राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत निर्मात्यांची कडक शब्दांत कानउघडणी केली.

नेमका वाद काय होता?

रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात ६४ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत हे नाटक सादर करण्यात आले होते. अमोल रेंगे लिखित आणि दिग्दर्शित, तसेच जयप्रकाश पाखरे आणि वीरशैव समाज, लांजा निर्मित या नाटकात वारकरी भक्तांना चक्क ‘हत्यारे’ म्हणून दाखवण्यात आले होते. यामुळे वारकरी संप्रदायाची प्रतिमा मलिन करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाल्याचा आरोप हिंदू जनजागृती समिती आणि वारकरी संप्रदायाने केला.

मंत्री उदय सामंत यांची आक्रमक भूमिका

या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट, सतीश सोनार आणि रवी नलावडे यांनी मुंबईत मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन दिले. यावेळी भाजपचे आमदार सत्यजित देशमुख देखील उपस्थित होते.

ना. सामंत यांनी तात्काळ निर्मात्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला आणि संतांच्या नावाने चाललेला हा अनाचार थांबवण्याचे आदेश दिले.

निर्मात्यांचा माघार आणि लेखी निर्णय

मंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर नाटकाच्या निर्मात्यांनी नमती भूमिका घेतली आहे. त्यांनी पुढील निर्णय लेखी स्वरूपात दिले आहेत:

  • नाटक स्थगिती: सद्यस्थितीत नाटकाचे सर्व प्रयोग थांबवण्यात आले आहेत.
  • बदल करण्याचे आश्वासन: नाटकाचे नाव, कथानक आणि पात्रांच्या नावांमध्ये पूर्णपणे बदल करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.

वारकरी संप्रदायाचा विजय

हिंदू धर्माच्या आणि वारकरी संप्रदायाचा अपमान करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध हा एक मोठा विजय मानला जात आहे. “संतांच्या आणि भक्तीच्या नावाखाली चुकीचा संदेश देणारे सादरीकरण खपवून घेतले जाणार नाही,” अशी भावना यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:23 09-03-2026