खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील धामणदेवी ग्रामपंचायतीच्या कारभारात मोठी अनियमितता झाल्याचे समोर आले आहे. जीईएम (GeM) पोर्टलद्वारे करण्यात आलेली खरेदी आणि विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारीची दखल घेत, जिल्हा परिषदेने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
धामणदेवी ग्रामपंचायतीने जीईएम पोर्टलवरून लॅपटॉप, प्रिंटर, टेबल आणि इतर साहित्याची खरेदी केली होती. या खरेदी प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही खरेदी चुकीच्या पद्धतीने करण्यात आली असून विकासकामांच्या देयकांवर सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार यांच्या स्वाक्षऱ्या नसल्याचेही निदर्शनास आले आहे.
संदेश पेवेकर यांचे उपोषण आणि प्रशासकीय हालचाली
ग्रामपंचायत सदस्य संदेश पेवेकर यांनी या भ्रष्टाचाराविरोधात खेड पंचायत समितीसमोर लक्षवेधी उपोषण सुरू केले होते. या तक्रारीची गंभीर दखल घेत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी खेडचे गटविकास अधिकारी (BDO) गणेश मंडलिक यांना सखोल चौकशी करून दोषारोपपत्र तयार करण्याचे लेखी आदेश दिले आहेत.
गटविकास अधिकाऱ्यांनी पेवेकर यांना लेखी पत्र देऊन ८ दिवसांत कारवाई पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनानंतर पेवेकर यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.
महत्त्वाच्या मागण्या आणि कायदेशीर कारवाई
- प्रशासक नियुक्तीवर आक्षेप: चौकशी सुरू असेपर्यंत संबंधित व्यक्तीची प्रशासक म्हणून नियुक्ती करू नये, अशी मागणी पेवेकर यांनी केली आहे. पारदर्शक चौकशीसाठी तटस्थ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची विनंती अर्जात करण्यात आली आहे.
- शिस्तभंग विषयक कारवाई: चौकशीत अनियमितता आढळल्यास संबंधित दोषींवर ‘महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४’ नुसार कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- कागदपत्रांची पडताळणी: जीईएम पोर्टलवरील खरेदीच्या आवश्यक तपशिलांची आणि देयकांची सखोल पडताळणी करण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू होणार आहे.
प्रशासनाचा इशारा
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, दोषी आढळणाऱ्या कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:23 09-03-2026













