रत्नागिरी: रत्नागिरी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीमध्ये शिवसेनेने आपली सत्ता कायम राखली आहे. सभापतीपदी प्रवीण पांचाळ आणि उपसभापतीपदी गजानन धनावडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सामान्य कार्यकर्त्यांना संधी देऊन एक नवा आदर्श घालून दिला असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे.
सामान्य कार्यकर्त्यांना मिळाला न्याय
पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी रात्री उशिरा या नावांची घोषणा केली होती. या निवडीमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असला तरी, वर्षानुवर्षे पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे. करबुडे गणाचे सदस्य प्रवीण पांचाळ आणि कुवारबाव गणातून विजयी झालेले गजानन धनावडे यांना ही महत्त्वाची पदे देण्यात आली आहेत.
निवड प्रक्रिया आणि पदभार स्वीकार सोहळा
सोमवारी जिल्हा परिषद आवारातील स्व. शामराव पेजे सभागृहामध्ये ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी काम पाहिले, तर त्यांना गटविकास अधिकारी शेळके यांनी साहाय्य केले. सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही प्रक्रिया सायंकाळी साडेतीन वाजेपर्यंत चालली. निवडीनंतर प्रवीण पांचाळ यांनी सर्व सदस्यांच्या उपस्थितीत आपला पदभार स्वीकारला.
प्रवीण पांचाळ यांचा राजकीय प्रवास
- मतदारसंघ: शिवसेनेच्या करबुडे गणातून ते निवडून आले आहेत.
- अनुभव: गेली अनेक वर्षे शिवसेनेत सक्रिय असून त्यांनी लाजुळ ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणूनही उत्तम काम केले आहे.
- विशेष: जिल्हा परिषद निवडणुकीत तालुकाप्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप यांना मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
“पालकमंत्री ना. सामंत यांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला आहे. करबुडे गणातील मतदारांचा मी आभारी असून, त्यांनी टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवेन.” — प्रवीण पांचाळ, सभापती, पंचायत समिती, रत्नागिरी
उपसभापतीपदी गजानन धनावडे
कुवारबाव गणातून विजयी झालेले गजानन धनावडे यांची उपसभापतीपदी निवड झाली. निवडीनंतर प्रतिक्रिया देताना ते भावूक झाले होते. “आपण कधी या पदावर बसू असे वाटले नव्हते, पण पक्षाने दिलेली जबाबदारी मी समर्थपणे पेलेन,” असे त्यांनी नमूद केले.
विजयी मिरवणूक आणि जल्लोष
या निवडीवेळी तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी भगवे फेटे परिधान केले होते. निवडीनंतर करबुडे आणि लाजुळ परिसरात ढोल-ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर प्रवीण पांचाळ यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.
उपस्थित मान्यवर: यावेळी तालुकाप्रमुख बंड्या साळवी, बाबू म्हाप, जि.प. सदस्य प्रकाश रसाळ, महेंद्र झापडेकर, युवक तालुकाप्रमुख तुषार साळवी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:54 10-03-2026












