चिपळूण पंचायत समितीवर ‘महायुती’चा झेंडा! सभापतीपदी सूर्यकांत खेतले, तर उपसभापतीपदी संदेश आयरे यांची बिनविरोध निवड

चिपळूण: चिपळूणच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर पडदा पडला आहे. चिपळूण पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत ‘महायुती’ पुन्हा एकदा एकवटली असून, दोन्ही महत्त्वाच्या पदांवर बिनविरोध निवड करण्यात यश आले आहे. सभापतीपदी राष्ट्रवादीचे सूर्यकांत खेतले आणि उपसभापतीपदी शिवसेनेचे संदेश आयरे यांची बिनविरोध वर्णी लागली आहे.

त्रिशंकू परिस्थितीनंतर महायुतीचे कमबॅक

चिपळूण पंचायत समितीच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. राष्ट्रवादीने ७, शिवसेनेने ४, भाजपने ३ तर ठाकरे शिवसेनेने ४ जागा जिंकल्या होत्या. या त्रिशंकू अवस्थेमुळे सत्तेत कोण येणार? याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, ऐनवेळी महायुतीचे घटक पक्ष (राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप आणि आरपीआय) एकत्र आल्याने ठाकरे गटाला विरोधी बाकावर बसावे लागले आहे.

निवड प्रक्रिया आणि निकाल

सोमवारी ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडली. पीठासीन अधिकारी आकाश लिगाडे यांनी या निवडणुकीचे कामकाज पाहिले.

  • सभापतीपद: राष्ट्रवादीकडून सूर्यकांत खेतले यांनी अर्ज दाखल केला.
  • उपसभापतीपद: शिवसेनेकडून संदेश आयरे यांनी अर्ज भरला.

दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत होती, मात्र त्यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने ३:३० वाजता या दोघांचीही निवड बिनविरोध झाल्याचे अधिकृतपणे घोषित करण्यात आले.

प्रमुख नेत्यांची भूमिका: आमदार शेखर निकम, शिवसेना उपनेते सदानंद चव्हाण आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली ही युती आकारास आली, ज्यामुळे महायुतीने सत्ता काबीज केली.


विजयी जल्लोष आणि मान्यवरांची उपस्थिती

निवड जाहीर होताच पंचायत समितीच्या आवारात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यासाठी विविध पक्षांचे नेते उपस्थित होते.

उपस्थित प्रमुख मान्यवर:

  • शिवसेना: गटनेते विनोद झगडे, राकेश शिंदे.
  • ठाकरे शिवसेना: गटनेते गौरव पाटेकर.
  • भाजप: गटनेते विनोद भुरण, जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, आशिष खातू, स्वानंद रानडे.
  • राष्ट्रवादी: तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, माजी पं.स. सदस्य बाबू साळवी, दिलीप माटे, जितेंद्र चव्हाण, मयूर खेतले.

तात्काळ स्वीकारला पदभार

निवडीनंतर पीठासीन अधिकारी यांनी नवनियुक्त सभापती आणि उपसभापतींना प्रमाणपत्र प्रदान केले. त्यानंतर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांच्या उपस्थितीत सूर्यकांत खेतले यांनी तत्काळ आपल्या सभापतीपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी नवनिर्वाचित महिला पंचायत समिती सदस्यांनीही नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 10-03-2026