गुहागर पंचायत समितीवर १४ वर्षांनंतर युतीचा झेंडा! सभापतीपदी प्रणव पोळेकर, तर उपसभापतीपदी भाजपचे नीलेश सुर्वे

गुहागर: गुहागरच्या राजकारणात तब्बल १४ वर्षांनंतर एक मोठा बदल पाहायला मिळाला आहे. गुहागर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत शिवसेना-भाजप युतीची सत्ता पुन्हा एकदा प्रस्थापित झाली आहे. सभापतीपदी शिवसेनेचे प्रणव पोळेकर आणि उपसभापतीपदी भाजपचे नीलेश सुर्वे यांची बिनविरोध निवड झाली असून, तालुक्याच्या विकासासाठी ही युती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

बिनविरोध निवडीने तालुक्यात जल्लोष

गुहागर पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीची औपचारिकता निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार परीक्षित पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली. ९ मार्च रोजी सकाळी दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने दुपारी ३:३० वाजता ही निवड बिनविरोध झाल्याचे अधिकृतपणे घोषित करण्यात आले.

विकासाची ग्वाही: निवडीनंतर बोलताना नवनियुक्त सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती नीलेश सुर्वे यांनी सांगितले की, “मागचे सर्व हेवेदावे बाजूला सारून सर्वांना सोबत घेऊन गुहागर तालुक्याच्या विकासाचा वेग वाढवणार आहोत.”


पक्षीय बलाबल आणि राजकीय समीकरण

गुहागर पंचायत समितीमध्ये सध्या राजकीय स्थिती खालीलप्रमाणे आहे:

  • शिवसेना: ५ जागा
  • भाजप: ४ जागा
  • उबाठा शिवसेना: १ जागा

या बलाबलानुसार शिवसेना आणि भाजप एकत्र आल्याने युतीचे पारडे जड झाले आणि १४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर गुहागर पंचायत समितीवर पुन्हा एकदा युतीची सत्ता आली.

डॉ. विनय नातू यांचा विश्वास

या विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना माजी आमदार डॉ. विनय नातू म्हणाले की, “तांत्रिक मुद्दे सोडले तर १४ वर्षांनी पुन्हा एकदा पंचायत समितीवर युतीची सत्ता आली आहे. पोळेकर आणि सुर्वे हे दोन्ही अनुभवी चेहरे आहेत. शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवून ते गुहागरचा विकास करतील, असा विश्वास मला आहे.”


उपस्थित मान्यवर

या ऐतिहासिक निवडीप्रसंगी शिवसेना आणि भाजपचे अनेक दिग्गज पदाधिकारी उपस्थित होते, त्यामध्ये:

  • भाजप: तालुकाध्यक्ष अभय भाटकर, सरचिटणीस सचिन ओक, जिल्हा ओबीसी अध्यक्ष मंगेश रांगळे, नगराध्यक्ष नीता मालप.
  • शिवसेना: तालुकाप्रमुख दीपक कनगुटकर, सचिव संतोष आग्रे. याशिवाय युतीचे सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:07 10-03-2026