PM Kisan Yojana: ‘पीएम किसान’ योजनेच्या २२ व्या हप्त्याची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार २ हजार रुपये

नवी दिल्ली / मुंबई: देशातील कोट्यवधी बळीराजासाठी केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या हप्त्याची शेतकरी चातकासारखी वाट पाहत होते, त्या ‘पीएम किसान सन्मान निधी’ (PM Kisan Samman Nidhi) योजनेच्या २२ व्या हप्त्यावर अखेर सरकारने अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. येत्या १३ मार्च २०२६ रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २-२ हजार रुपये जमा होणार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार निधीचे वितरण

केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (ट्विटर) वरील आपल्या अधिकृत हँडलवरून या महत्त्वपूर्ण निर्णयाची माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ मार्च रोजी आसाम दौऱ्यावर असताना एका विशेष कार्यक्रमात रिमोटचे बटण दाबून देशातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी (DBT) द्वारे ही रक्कम वर्ग करणार आहेत. होळीच्या सणापूर्वी हा निधी मिळणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


सावधान! ‘या’ ४ चुकांमुळे तुमचा हप्ता अडकू शकतो

सरकारने तारीख जाहीर केली असली, तरी सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे येतीलच असे नाही. खालील तांत्रिक बाबी पूर्ण नसल्यास तुमचा २ हजार रुपयांचा हप्ता रोखला जाऊ शकतो:

१. ई-केवायसी (e-KYC): ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना या हप्त्यापासून मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे. २. नवीन फार्मर आयडी (Farmer ID): नवीन नियमांनुसार, आता ई-केवायसी सोबतच ‘फार्मर आयडी’ तयार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ३. बँक खाते आणि आधार लिंकिंग: तुमचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक असणे अनिवार्य आहे. तसेच फॉर्म भरताना खाते क्रमांक किंवा IFSC कोडमध्ये चूक असल्यास पैसे जमा होणार नाहीत. ४. भूमी पडताळणी (Land Seeding): ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींची पडताळणी (Land Validation) अद्याप प्रलंबित आहे, त्यांचा हप्ता सरकारकडून थांबवला जाऊ शकतो.


आपले नाव यादीत कसे तपासायचे?

तुमचा हप्ता येणार की नाही, हे तपासण्यासाठी शेतकरी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर (pmkisan.gov.in) जाऊन ‘Beneficiary Status’ या पर्यायावर क्लिक करून आपली माहिती तपासू शकतात.

महत्त्वाची टीप: जर तुमची वरीलपैकी कोणतीही प्रक्रिया अपूर्ण असेल, तर १३ मार्चपूर्वी ती जवळच्या सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने त्वरित पूर्ण करून घ्यावी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 10-03-2026