रत्नागिरी : दीपावलीनिमित्त आकाशकंदील, पणत्या, रेडिमेड फराळ, मेवा मिठाई, विद्युत तोरणे आणि विविध सजावटीच्या साहित्य खरेदीसाठी रत्नागिरीच्या बाजारपेठेत गर्दी जमू लागली आहे; परंतु महिनाअखेरीस आलेली दीपावली, विधानसभेच्या निवडणुका आणि वाढती महागाई व नोकरदारांचे न झालेले पगार अशा समस्यांमुळे बाजारात म्हणावी तेवढी गर्दी होऊ शकली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
पुढील दोन दिवसांत खरेदीचा उत्साह पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दिव्यांच्या उत्सवाला वसुबारसने प्रारंभ झाला आहे. नरक चतुर्दशी गुरूवारी (ता. ३१) असून पहिले अभ्यंगस्नान होणार आहे. यंदा समाधानकारक पावसामुळे बळीराजाही खूष झाला आहे. त्यामुळे पिवळे सोने घेऊन बळीराजा दिवाळी साजरा करणार आहे. किल्ले, मावळ्यांच्या दुनियेत बालदोस्त मंडळी रमली आहेत. ऑक्टोबर हीट व धुकेसुद्धा पडू लागले असून, गुलाबी थंडी पडायला लागणार आहे. त्यामुळे चैतन्यमय वातावरण पाहायला मिळत आहे. दीपावलीचा सण साजरा करण्यासाठी अवघा रत्नागिरी जिल्हा सज्ज झाला आहे. येत्या १ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन होणार असून, व्यापारी, उद्योजक, दुकानदार मंडळी लक्ष्मीपूजनासाठी तयारी करत आहेत. २ ला दिवाळी पाडवा आणि ३ ला भाऊबीज आहे. त्यामुळे बाजारात या कालावधीत खरेदीसाठी आणखी गर्दी होण्याची शक्यता आहे.
खाद्यतेल पिशवी ९५ वरून १६५ रुपये झाल्यामुळे मेवामिठाईला महागाईची झळ पोहोचली आहे. व्यापारी गणेश भिंगार्डे यांनी सांगितले की, गेल्या ६० वर्षांपासून आमचे दुकान सुरू आहे. दिवाळीसाठी खास मिक्स मिठाई ६०० रुपये किलो दराने विक्री करतोय; परंतु महागाईमुळे हा दर वाढवायला लागणार आहे. तयार फराळाला चांगली मागणी आहे; परंतु दरवाढीमुळे ग्राहक त्यांच्या क्षमतेनुसारच खरेदी करतात.
गृहोपयोगी वस्तू, कपड्यांची खरेदी
दसऱ्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र दीपावलीच्या तयारीला सुरवात झाली. घर झाडणीपासून अंगण तयार करणे, साफसफाई, भांडी, दागदागिने काढून सज्जता झाली. महागाई वाढली तरी थोडी झळ सोसून नवी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल असतो. कपडे, दागिने, गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
महागाईमुळे यंदा बाजारपेठेत फार गर्दी झाली नाहीये; परंतु दोन दिवसांत गर्दी वाढेल. रामआळी ते गोखलेनाका या बाजारपेठ मार्गावर वाहनांना बंदी केली आहे. त्यामुळे ग्राहकांना नीट खरेदी करता येईल. – गणेश भिंगार्डे, अध्यक्ष, व्यापारी महासंघ.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:05 30-10-2024














