खेड (रत्नागिरी): रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून मारहाणीची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. तालुक्यातील रसाळगड, झापाडीवाडी येथे सामाईक जमीन आणि झाडामाडांच्या वादातून एकाच कुटुंबातील ७ जणांनी मिळून फिर्यादी आणि त्यांच्या पतीला लाठ्याकाठ्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत पती गंभीर जखमी झाले असून, खेड पोलिसांनी सातही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुवर्णा संजय घाग (वय ४७ वर्षे) आणि आरोपी हे एकाच भावकीतील आहेत. त्यांच्यामध्ये सामाईक जागाजमीन आणि झाडामाडांच्या कारणावरून गेल्या काही काळापासून वाद सुरू होता. याच घरगुती वादाचा राग मनात धरून, मंगळवार दिनांक १० मार्च २०२६ रोजी दुपारी १२.१५ च्या सुमारास आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी यांच्या घरावर हल्ला केला.
लाठ्याकाठ्यांनी घरात शिरून हल्ला
‘मिटिंग’ घेण्याच्या बहाण्याने हे सातही आरोपी फिर्यादी सुवर्णा घाग यांच्या घरी आले. यावेळी वाद विकोपाला गेला आणि आरोपींनी फिर्यादी सुवर्णा घाग व त्यांचे पती संजय रामचंद्र घाग यांना लाठ्याकाठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. केवळ हातापायांनीच नव्हे तर लाथाबुक्क्यांनी केलेल्या या अमानुष मारहाणीत संजय घाग हे जखमी झाले आहेत. मारहाण करतानाच आरोपींनी दांपत्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली.
या ७ आरोपींवर गुन्हा दाखल
फिर्यादी सुवर्णा घाग यांनी दिलेल्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी खालील ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे: १) अनंत तुकाराम घाग २) भागोजी तुकाराम घाग ३) समीर भागोजी घाग ४) जितेश अनंत घाग ५) आदेश अनंत घाग ६) रितेश अनंत घाग ७) कृष्णा अनंत घाग (सर्व रा. रसाळगड, झापाडीवाडी, खेड)
कायदेशीर कारवाई
या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ च्या कलम १८९(१), १८९(२), १९०, १९१(२), १९१(३), ११८(१), ३५२ आणि ३५१(३) नुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२/२०२६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. बेकायदेशीर जमाव जमवणे, घातक शस्त्रांनी मारहाण करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे अशा गंभीर कलमान्वये हा तपास सुरू आहे.
खेड ग्रामीण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून, गावपातळीवरील वादाने हिंसक वळण घेतल्याने रसाळगड परिसरात खळबळ उडाली आहे.














